मुंबई : मुंबई महापालिकेच्या आपला दवाखान्यात दररोज तीन तास सफाईचे काम केल्यानंतर कंत्राटी कामगारांना अवघा पाच हजार रुपये पगार मिळणार आहे. कामाचे तास कमी असले तरी एवढ्या पगारात कामगारांचे कसे भागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक व अन्य खर्च वगळला, तर आमच्या हातात तीन ते साडेतीन हजार रुपयेच पडतील, अशी व्यथा या कामगारांनी व्यक्त केली आहे.
आपला दवाखाना येथील साफसफाईसाठी महापालिका सफाई कामगारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करते. या कामगारांना दवाखान्याची आतून, बाहेरून, परिसराची, तसेच स्वच्छतागृहांची साफसफाई करावी लागते. दवाखान्यातील सर्व फर्निचर व अन्य वस्तूंची स्वच्छता राखण्यासह दवाखान्यातील जैव वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) नियमांनुसार हाताळणे व विल्हेवाटीसाठी देणे, तसेच दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची गर्दी सांभाळणे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व औषध निर्माता व वरिष्ठांनी सांगितलेली अन्य कामे करावी लागतात. मात्र, दररोज तीन तास काम केल्यानंतर या कामगारांना महिन्याला अवघा पाच हजार पगार मिळणार आहे.
‘किमान १२ हजार रुपये वेतन द्या’-
मुंबईत रोजंदारीवर काम करणाऱ्याला किमान ५०० ते ६०० रुपये म्हणजे महिन्याला किमान १५ हजार रुपये तरी मिळतात. मात्र, आपला दवाखान्यात काम करणाऱ्या कामगाराला अगदीच तुटपुंजे वेतन मिळणार आहे. प्रवास खर्च, नाश्ता हा खर्च वगळून या कामगारांच्या हातात आणखी तुटपुंजी रक्कम मिळणार आहे. त्यात त्यांचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे. त्यांना किमान १० ते १२ हजार रुपये वेतन द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे कामगार नेते बाबा कदम यांनी सांगितले.