एमएमएस, एमसीएच्या प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ; ३१ जुलैपर्यंत भरता येणार ऑनलाइन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:52 AM2024-07-27T10:52:35+5:302024-07-27T10:53:42+5:30
एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ७२०, तर एमसीए या अभ्यासक्रमासाठी दोन हजार एवढी प्रवेश क्षमता आहे.
मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (सीडीओई) मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येतील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.
एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ७२०, तर एमसीए या अभ्यासक्रमासाठी दोन हजार एवढी प्रवेश क्षमता आहे. ‘एआयसीटीई’ आणि ‘यूजीसी’ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून सीडीओईच्या माध्यमातून एमएमएस हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी परवानगी दिली आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे तर एचआर, फायनान्स आणि मार्केटिंग या तीन विषयांत एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे.
११ ऑगस्टला परीक्षा-
१) या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ११ ऑगस्टला ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
२) या अभ्यासक्रमांच्या पात्रता, शुल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या सीडीओईच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
३) प्रवेश परीक्षेसाठीचा अर्ज विद्यापीठाच्या https://mumidol.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून सादर करता येईल, अशी माहिती दिली.