लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याबाबत शासन निर्णय लवकरच होईल, असे आश्वासन एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी बुधवारी अंगणवाडी सेविकांना दिले आहे. त्यामुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून, अंगणवाडी सेविका नियमितपणे काम करतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली. मानधन वाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटी या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून मागील महिनाभर असहकार आंदोलन करण्यात येत होते.
‘कॅबिनेटच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार’-
१) सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले.
२) आयुक्त कैलास पगारे यांनी अंगणवाडी सेविकांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला त्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली. याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यानंतर शासन आदेश निघेल, असे सांगितले.
३) महागाई भत्त्याबाबत वित्त खात्याकडून शंकांचे निरसन झाल्यानंतर हा मुद्दा मार्गी लागेल, असे आश्वासन दिल्याची माहिती शमीम यांनी दिली.
आम्ही आता आंदोलन स्थगित करत आहोत.आतापर्यंत सुरू असलेले असहकार आंदोलन मागे घेत आहोत. यापुढे काम नियमित करण्यात येणार आहे. मात्र, पुढील १५ दिवसांमध्ये प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ मंजूर न झाल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करू. - शुभा शमीम, निमंत्रक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती