मुंबई : स्वमालकीचा ३ हजार ३३७चा बस ताफा कायम ठेवण्यासाठीची धडपड, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी आणि अन्य देणी देण्यासाठीचे वाढलेले ओझे, खासगीकरणाची टांगती तलवार, १५ वर्षांत नऊ लाख प्रवाशांची झालेली घट यामुळे संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेचे चाक अधिकाधिक खोलात रुतले आहे. आजच्या बेस्ट दिनाच्या निमित्ताने या सर्वांचा विचार व्यवस्थापनाने करावा, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. बेस्ट प्रशासनाला आर्थिक साहाय्य देण्यास आता पालिकेनेही हात आखडता घेतल्याने राज्य सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याची गरज बेस्ट संघटना व्यक्त करीत आहेत.
बेस्ट बस सेवा मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. बेस्टची संचित तूट तब्बल आठ हजार कोटींवर पोहोचली आहे. २०१९-२० पासून ते २०२३-२४ मधील ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत केलेल्या तरतुदींमधून ३ हजार ४२५.३२ कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून ४ हजार ६४३.८६ कोटी रुपये, असे एकूण ८ हजार ०६९.१८ कोटी एवढ्या रकमेची मदत महापालिकेने 'बेस्ट'ला केली आहे.
..म्हणून भारतीय संघाची मिरवणूक बेस्टमधून नाही-
मुंबई दर्शनासाठी बेस्ट उपक्रमाच्या खुल्या बस (ओपन बस) होत्या. मात्र, ऑक्टोबर २०२३ मध्ये या बस भंगारात काढल्याने तेव्हापासून बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकही खुली बस आली नाही. त्यामुळे भारतीय संघाची विजयी मिरवणूक बेस्टच्या बसमधून काढता आली नाही. खुल्या बसेसची निविदा प्रक्रिया रखडली आहे.
गाड्यांची प्रतीक्षा-
दोन हजार १०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर वातानुकूलित बस पुरवण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला मिळाल्याने निविदा प्रक्रियेवरच बोट ठेवून ती अपात्र ठरवण्यासाठी टाटा मोटर्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या निर्णयाला आव्हान देणारे अपील न्यायालयाने मागील वर्षी मे महिन्यात फेटाळले होते. त्यामुळे या बस ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. डिसेंबर २०२३पर्यंत या सर्व बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. त्यानंतर संबंधित कंपनीला यंदा मार्चची अंतिम मुदत दिली होती, त्यानंतरही पूर्ण ताफा दाखल झालेला नाही.
'त्या' कर्मचाऱ्यांची देणी बाकी-
ऑक्टोबर २०२३पासून पाच हजार कर्मचारी निवृत्त झाले. त्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळालेली नाही. कोविड काळातील २५ हजार कर्मचाऱ्यांचा ७८ कोटींचा कोविड भत्ता प्रलंबित आहे.
बेस्ट सेवा चालणार कशी?
प्रवाशांना अवेळी बस फेऱ्या सोडणे, बस फेऱ्या कमी असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. परिवहन विभागात एकूण १६ हजार ५७७ कर्मचारी होते. मात्र, मे महिन्यात बेस्टच्या संपूर्ण विभागातील ५५६ कर्मचारी निवृत्त झाले. निवृत्त झालेल्यांमध्ये ५० टक्के कर्मचारी परिवहन विभागातील आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली असून, येत्या काळात ही संख्या आणखी कमी होणार आहे.