मुंबई : कमालीची रखडपट्टी होऊन यथावकाश सुरू झालेल्या डिलाईल रोड पुलाच्या अडथळ्यांची शर्यत अजूनही सुरूच आहे. या पुलाला सरकते जिने उभारण्यासाठी आणखी सहा महिने लागणार आहेत. नोव्हेंबरमध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला होता. २४ जुलै २०१८ सालापासून हा पूल बंद करण्यात आला. पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड पुलामध्ये दोन्ही दिशांनी प्रत्येकी तीन मार्गिका, तर गणपतराव कदम मार्गावरील दोन्ही दिशांना प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर आता या पुलाला दोन सरकते जिने बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. एक जिना रेल्वेस्थानकाच्या दिशेने असेल, तर दुसरा जिना एन. एम. जोशी जंक्शन दिशेने बसवण्यात येणार आहे. हे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे, ती कंपनी पुण्यातील कारखान्यात जिने तयार करणार आहे.
दोन वेळा झाले औपचारिक उद्घाटन-
मुळातच हा पूल बराच काळ रखडला होता. पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटन होत नव्हते. पालकमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे उद्घाटन रखडले असून, त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत आमदार आदित्य ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत पुलाचे अनौपचारिक उद्घाटन केले होते. त्यानंतर काही दिवसांत पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पुलाचे औपचारिक उद्घाटन झाले.
पुलाला चार नवे जिने बांधण्यात येणार -
१) पुण्यात जिने तयार केल्यानंतर मुंबईत आणण्यात येतील. मात्र त्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. या पुलाला चार नवे जिनेही बांधण्यात येणार आहेत. पुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी शेवटची मार्गिका नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झाली.
२) मार्गिका सुरू झाल्याने करी रोड, लोअर परळ, चिंचपोकळी, भायखळा आणि डिलाईल रोड पूल परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळाला. लोकांची सोय व्हावी यासाठी पुलाला दोन सरकते जिने बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.