शहरात परवडणाऱ्या नव्हे, महागड्या घरांना मागणी; चालू वर्षात एकूण ४१ हजार ५९० घरांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:39 AM2024-06-20T10:39:19+5:302024-06-20T10:40:15+5:30
गेल्या वर्षी मुंबईत दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली होती. चालू वर्षातही गृहविक्री तेजीत असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई : गेल्या वर्षी मुंबईत दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली होती. चालू वर्षातही गृहविक्री तेजीत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्षात आतापर्यंत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये ३७ टक्के प्रमाण हे आलिशान घरांच्या विक्रीचे आहे. चालू वर्षात आतापर्यंत मुंबई शहरात एकूण ४१ हजार ५९० घरांची विक्री झाली आहे.
२०२३ या वर्षामध्ये मुंबई शहर व उपनगरात दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री झाली. यापैकी ६५ टक्के घरे ही वन-बी-एचके, तसेच टू-बी-एचके घरे होती. कोविड काळापासून मुंबईत ज्या गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरू होते, ते पूर्ण झाल्यामुळे घरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. घर खरेदीसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींनीही विक्रीच्या आकर्षक योजना सादर केल्या. याचा हातभार घरांच्या विक्रीचे प्रमाण वाढण्यास लागला आहे. एकूण ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेची मुंबईत खरेदी केली आहे.
घर खरेदीत बॉलिवूडचाही पुढाकार-
१) गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बॉलिवूडच्या कलाकारांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरांची खरेदी केली आहे. २०२३ पासून आतापर्यंत बॉलिवूडच्या कलाकारांनी एकूण ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेची मुंबईत खरेदी केली आहे.
२) यामध्ये घरांच्या खरेदीसोबत कार्यालयांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम, शाहिद कपूर, प्रीती झिन्टा, अभिषेक बच्चन, अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
पश्चिम उपनगरात घर खरेदी करण्याकडे कल-
मुंबई पश्चिम उपनगरातील बहुतांश विकासकामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे वांद्रा, खार, सांताक्रूझ, अंधेरी, बोरिवली या उपनगरातील प्रमुख भागांत मोठ्या प्रमाणावर घर खरेदी होताना दिसत आहे.
...म्हणून अधिक पैसे मोजण्याची तयारी
१) मुंबई शहरात विशेषतः उपनगरात अनेक ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. इमारतीमधील मूळ रहिवाशांची इमारत वेगळी केल्यानंतर बिल्डरांना जो सेल कॉम्पोनंट मिळतो, त्यामध्ये आलिशान घरांची बांधणी करण्याकडे विकासकांचा कल आहे.
२) या घरांना चांगला प्रतिसाद मिळण्याचे कारण म्हणजे, मुंबई व उपनगरामध्ये अनेक ठिकाणी विकासकामे पूर्ण झाली आहेत. याचा फायदा लोकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी अधिक पैसे मोजून घर घेण्याकडे लोकांचा कल आहे.