दादर मोकळा श्वास कधी घेणार? कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:10 AM2024-08-03T10:10:12+5:302024-08-03T10:12:11+5:30
मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या दादर स्थानकाच्या पश्चिमेला सकाळी, दुपारी आणि सायंकाळी फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असतो.
मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या दादर स्थानकाच्या पश्चिमेला सकाळी, दुपारी आणि सायंकाळी फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असतो. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करूनही ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याचे चित्र असते.
दादर पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेले रस्ते मुळातच निमुळते आहेत. त्यात एका बाजूला बसलेल्या फेरीवाल्यांमुळे रस्ते आणखी अरुंद होत असून, टॅक्सी किंवा चारचाकी वाहन या रस्त्यांवरून आल्यानंतर पादचाऱ्यांना उभे राहण्यासही जागा शिल्लक राहत नाही. दुकानांबाहेरील फूटपाथही फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात, तर दादर परिसरातील फेरीवाल्यांना कोपरेही काबीज केलेले असतात. फेरीवाल्यांमुळे बेस्टच्या बसना वळण घेता येत नसल्याने फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती. फेरीवाल्यांमुळे बेस्ट बससाठी धड रांगही लावता येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेकडून कारवाई करूनही परिस्थितीत काहीच बदल होत नसल्याचे चित्र आहे.
कुर्ला-
१) कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला रोजच फेरीवाल्यांचा विळखा पडलेला असतो. पश्चिमेच्या तुलनेत पूर्वेला फेरीवाल्यांची संख्या कमी आहे.
२) मात्र पश्चिमेकडे गणपती मंदिरापासून ३३२ बेस्ट बस स्टॉपपर्यंत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलेला असतो. गणपती मंदिरापासून रेल्वे स्थानकापर्यंत टेबल टाकून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना अडचणी येतात.
३) फेरीवाल्यांवर पालिकेकडून अनेक वेळा कारवाई केली जाते. मात्र पुन्हा पुन्हा हे फेरीवाले या परिसरात आढळून येतात. सकाळी महापालिकेची कारवाई करणारी गाडी परिसरात असेपर्यंत परिसर मोकळा असतो. मात्र गाडी गेल्यावर संपूर्ण परिसर फेरीवाल्यांनी भरून जातो.