Join us  

मनपा देईना डिजिटल होर्डिंग्जवरील कारवाईचा तपशील; चित्रफितीमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 10:13 AM

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने होर्डिंगसंदर्भात धोरण तयार केले आहे.

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने होर्डिंगसंदर्भात धोरण तयार केले आहे. तसेच डिजिटल होर्डिंग संदर्भातही ठोस भूमिका घेताना हे होर्डिंग रात्री ११ वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रात्री ११ वाजल्यानंतर किती डिजिटल होर्डिंग्ज सुरू असतात, अशा होर्डिंग्जवर काय कारवाई केली, याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे डिजिटल होर्डिंग्जवरील कारवाईचा तपशील गुलदस्त्यातच आहे.

घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगविरोधात कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील बेकायदा होर्डिंग्ज काढण्यास सांगण्यात आले आहे. काही होर्डिंग पालिकेनेही स्वतः उतरविले आहेत. त्यानंतर पालिकेने होर्डिंग धोरण तयार करण्यास सुरुवात केली. हे धोरण अंतिम टप्प्यात आहे. अन्य होर्डिंग्जसह डिजिटल होर्डिंग्जबाबतही पालिकेने भूमिका घेतली आहे. 

डिजिटल होर्डिंग्जचा प्रकाश अतिप्रखर असतो. या होर्डिंग्जवर चित्रफिती झळकत असतात. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. त्याचबरोबर अशी होर्डिंग्ज ज्या निवासी इमारतींच्या आसपास लावलेली असतात, तेथील रहिवाशांनाही उजेडामुळे त्रास होतो, अशाही तक्रारी आहेत. विशेष म्हणजे अशी होर्डिंग्ज  रात्रभर सुरू असतात. त्यामुळे डिजिटल होर्डिंग्ज रात्री ११ वाजल्यानंतर बंद करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. त्यानंतरही होर्डिंग्ज चालू दिसल्यास संबंधित जाहिरात संस्थेची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. होर्डिंग सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ करून त्याबाबत माहिती देण्याचे निर्देश प्रशासनाने पथकांना दिले आहेत.

सर्वेक्षण पूर्ण : महापालिका -

डिजिटल होर्डिंगबाबत निर्णय होऊन जवळपास महिना होत आला आहे. मात्र, आतापर्यंत किती डिजिटल होर्डिंग्ज रात्री ११ नंतर चालू होते, किती जाहिरात संस्थांवर कारवाई करण्यात आली, याची कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. 

मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, एवढेच परवाना विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, अन्य तपशील उपलब्ध झाला नाही. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाघाटकोपर