विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:04 AM2024-08-24T09:04:27+5:302024-08-24T09:07:22+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढच्या १५ दिवसांत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढच्या १५ दिवसांत अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शहर विभागाच्या १० मतदारसंघांसाठी ५०० कोटी खर्च करण्यात येणार असून, यामधील जवळपास ३५० कोटी पालिका प्रशासनकडून, तर १५० कोटी जिल्हा विकास नियोजन समितीकडून खर्च करण्यात येणार आहेत.
शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील ६२ विविध प्रकल्पांचा आढावा शुक्रवारी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त, अधिकारी यांच्यासोबत घेतला.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, ती राहण्यास उत्तम आणि सुविधा युक्त असावी,असा आमचा प्रयत्न असल्याचे केसरकर म्हणाले. पालिकेच्या भूमिगत बाजाराची संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यासाठी अधिकाऱ्यांनी काही ठिकाणांचे सर्वेक्षणही केले आहे. मात्र, अद्याप भूमिगत बाजारांसाठी काहीच हालचाल न झाल्याने यासाठी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना केसरकर यांनी दिल्या आहेत. भूमिगत बाजारांसाठी पालिकेकडून दादर टीटी, कोतवाल गार्डन या ठिकाणांची निवड केली होती.
याशिवाय बीपीटीच्या जागेवर आपला दवाखानाच्या प्रस्तावासाठी बीपीटीलाच प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, यावर काहीच कार्यवाही न झाल्याने आता पालकमंत्र्यांनी पालिकेला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून नियुक्त केले असून, पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि कॉटन मार्केट ते मुंबादेवी परिसर हा झोपडपट्ट्या आणि अतिक्रमणाने वेढला गेला आहे. हा परिसर पोलिसांच्या मदतीने पुढच्या ४ दिवसांत अतिक्रमणमुक्त करण्याची हमी केसरकर यांनी दिली.
फॅशन स्ट्रीटचा कायापालट-
१) मुंबादेवी, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी, हाजी अली दर्गा यांचा विकास करणार.
२) फॅशन स्ट्रीटचा चेहरा मोहरा बदलणार, सर्व व्यावसायिकांना समान आकाराच्या जागा आणि स्टॉल्स देणार.
३) फुटपाथवर राहणाऱ्यांसाठी एसी शेल्टर होम्सची व्यवस्था करणार.
४) हाजी अली येथील सबवेमध्ये फाइव्ह स्टार एसी स्वच्छतागृहे.
राणीच्या बागेत मत्स्यालय-
१) प्रभादेवी ते माहीम जिओ ट्यूब्स तंत्रज्ञान बसवणार.
२) पालिका शाळांतील रंगरंगोटी हाती घेण्यात येईल.
३) महाराष्ट्र दालनाचे सुशोभीकरण.
४) राणीच्या बागेत मत्स्यालयाचे काम सुरू करणार.
५) मुंबई पोलिसांच्या वसाहतीच्या दुरुस्त्या हाती घेणार.
६) गोविंदासाठी प्रत्येक वॉर्डात सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना.
७) वरळी कोळीवाड्यात बॅटरी ऑपरेटेड कारसह बॅटरी ऑपरेटेड ॲम्बुलन्सची व्यवस्था करणार.
८) कामगारांसाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करणार.
९) क्रॉफर्ड मार्केटमधील हातगाड्यांच्या जागी बॅटरी ऑपरेटेड गाड्यांची सुविधा देणार.