Join us

मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 9:59 AM

कोस्टल रोड हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी तयार.

मुंबई : महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (कोस्टल रोड) १० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला आहे. या रस्त्याचे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले केल्यानंतर आता वांद्रे-वरळी सी लिंक आणि कोस्टल रोड सुरू करण्याच्या दिशेने पालिकेचे नियोजन सुरू आहे. पालिकेकडून लवकरच कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेचा आणखी एक भाग अंशतः खुला केला जाणार आहे. वांद्रे-वरळी सी लिंकच्या आधी असणारा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी तयार असून तो खुला करण्यात येणार आहे. 

यामुळे आता मुंबईकरांना मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा थेट प्रवास शक्य होणार आहे. या आधी मरिन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतची मार्गिका खुली करण्यात आली आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील उत्तर वाहिनीवर हाजी अलीपासून ते खान अब्दुल गफार खानमार्गे राजीव गांधी सागरी सेतू दरम्यानची सुमारे साडेतीन किलोमीटर उत्तर अंतराच्या मार्गिकेची पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी उपस्थित होते.

महिनाभरात मरिन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सी-लिंक कोस्टल रोड हा वांद्रे सी-लिंक ते वरळीला जोडणीसाठी बो स्टिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

कोस्टल रोड (दक्षिण) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत.

वांद्रे सी-लिक ते वरळीपर्यंत सुसाट प्रवास करता येणार आहे. मात्र, त्याकरिता पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागणार आहे

पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत- 

१) कोस्टल रोड प्रकल्पातील कामे टप्प्या-टप्प्याने पूर्ण केली जात आहेत. १०.५८ कि.मी.चा कोस्टल रोड आणि ४.५ कि.मी. लांबीचा वांद्रे- वरळी सी-लिंकला जोडणारे दोन्ही महाकाय गर्डर बसविण्यात आलेत.

२) त्यामुळे वांद्रयाहून- दक्षिण मुंबई असा पाऊण तासांचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत करता येणे शक्य आहे.

३) कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तर वाहिनीच्या कामाची मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी, प्रकल्पाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम आदींनी पाहणी केली.

४) या प्रकल्पामुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :मुंबईनगर पालिकावरळी