गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:39 AM2024-08-22T11:39:29+5:302024-08-22T11:41:31+5:30
यंदाच्या गणेशोत्सवात ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरांत तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरांत तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित मंडळांना तात्पुरती वीजजोडणी मिळेल. त्यासाठी वेबसाइटवर ‘न्यू कनेक्शन’ या विभागात तात्पुरत्या वीजजोडणीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
गेल्या वर्षी याच प्रकारे ९५८ गणेशोत्सव मंडळांना वीजपुरवठा करण्यात आला होता. या संदर्भात अडचण आली, तरी ती सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहेत. मंडपांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच गणेशोत्सव मंडपात येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी मंडपातील विजेचे वायरिंग करण्यासाठी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांचीच मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील गणेश विसर्जनच्या ८० ठिकाणी फ्लड लाइट लावून तो परिसर प्रकाशमान केला जाणार आहे.
गणेशोत्सव मंडळांना सूचना-
१) मंडपात सर्व वायरिंग सुसज्ज ठेवा.
२) वीजजोडणीसाठी मान्यताप्राप्त वायर आणि स्विचेसचा वापर करा.
३) आपात्कालीन स्थितीच्या वेळेला सर्व मंडपांचा वीजपुरवठा बंद करण्यासाठी एकच स्विच ठेवा.
४) वायरिंग झाल्यानंतर वायर विस्कळीत स्थितीत न ठेवता चिकटपट्ट्यांच्या साह्याने त्या बांधून ठेवा.
५) मंजूर झालेल्या विजेच्या क्षमतेपेक्षा मंडपातील विजेचा वापर जास्त नसावा.
६) जनरेटर असल्यास त्याला अर्थिंग असावे. बॅकअप जनरेटर असल्यास त्याच्यासाठी न्यूट्रल असावा.
७) एक्सटेन्शन कॉर्डसाठी थ्रीपिन प्लग वापरा.
८) मीटर केबिन जवळ अग्निशामन उपकरण ठेवा.