फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 09:38 AM2024-09-14T09:38:27+5:302024-09-14T09:39:51+5:30
मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. फलाटावर प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या स्टॉल्सना फलाटाच्या शेवटच्या टोकाला स्थलांतरित केले जात आहे. फलाटांवरील एकूण ३० स्टॉल्सच्या स्थलांतरामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिकची मोकळी जागा मिळणार आहे.
दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर, वडाळा रोड या स्थानकांवरील २१ फूड स्टॉल्सचे स्थलांतर पूर्ण झाले आहे, तर डोंबिवली आणि कल्याण स्थानकांवरील उर्वरित ९ स्टॉल्सचे स्थलांतराचे काम सध्या सुरू आहे. या बदलामुळे फलाटाच्या मध्यभागी असलेल्या स्टॉल्सच्या जागेत जवळपास ३५ ते ४५ चौरस फूट अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे.
नवीन स्टॉल्सना परवानगी नाही-
सध्या सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांना त्यांची पाच वर्षे इतकी मुदत संपल्यावर मुदतवाढ मिळणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पुढील काळात गरज लक्षात घेऊन नवीन दुकानांबाबत निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक फूड स्टॉल सरासरी ३५ ते ४५ चौरस फूट क्षेत्रफळ इतकी जागा व्यापतो. या स्टॉल्सवर खाद्यपदार्थ घ्यायला येणाऱ्या प्रवाशांमुळे बऱ्याचदा इतरांना अडथळा निर्माण होत असतो. यासाठी हा निर्णय घेतला आहे. - डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे