Join us  

मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:54 AM

दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते.

मुंबई : दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते. यावेळी गणेशोत्सवाला एक महिना राहिला असताना पालिकेकडून ही सुविधा सुरूच झालेली नाही. परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी मिळवण्यासाठी किमान १० ते १५ दिवस लागतात. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे.

मुंबईत १२ हजारांपेक्षा नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळे आहेत. पालिकेकडून परवानगीसाठी प्रत्येक विभाग कार्यालयात ऑनलाइन एक खिडकी योजना सुविधा उपलब्ध केली जाते. अर्ज प्राप्त झाल्यापासून परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र पाच ते सात दिवसांत मंडळांना देण्याचा प्रयत्न असतो. या प्रक्रियेसाठी मंडळांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महापालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिसांची परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र हे विभाग कार्यालयातील एका खिडकीवर उपलब्ध होते किंवा त्यासाठी मंडळांच्या सदस्यांना प्रत्यक्ष कार्यालयात यावे लागते. काही वेळा सदस्य वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस किंवा अन्य विभागांतही प्रत्यक्ष जाऊन परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र घेतात.

न्यायालयाच्या सूचनेनुसार दरवर्षी किमान महिनाभर आधी परवानगी प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक आहे. यंदा अद्यापही पालिकेकडून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध झालेली नाही. मंडपाची परवानगी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष मंडप सजावटीत बरेच दिवस जातात, शिवाय यामुळे वॉर्डनिहाय नियोजनाच्या बैठकही खोळंबल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळापुढे पेच निर्माण झाला आहे. - ॲड. नरेश दहिबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

बैठकीनंतरही कार्यवाही नाही -

१) गणेशोत्सव मंडळांचा त्रास दूर करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर विविध परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रही मंडळांना ऑनलाइन देण्याचा पालिकेचा प्रयत्न असतो. मंडळाच्या स्वतंत्र ई-मेल आयडी किंवा मंडळाच्या अध्यक्षांच्या ई-मेलवर ते उपलब्ध करून दिले जाते. 

२) मंडळाच्या सदस्यांना प्रत्येक विभाग कार्यालयात किंवा ना-हरकत प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागात जाण्याचा वेळ वाचतो. मात्र, ७ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाही आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणपती मूर्तींचे आगमन ११ ऑगस्टपासून होत असताना अद्याप मंडप परवानग्यांची सुविधा पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही. 

३) परिणामी मंडळांची पुढील सर्व कामे रखडल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी दिली. या संदर्भात पालिकेसोबत बैठकाही झाल्या तरीही काहीच हालचाली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेशोत्सव