Join us

देशी-विदेशी प्रवाशांना घडतेय खड्ड्यांचे दर्शन; रस्त्यावरील खड्डे भरा : पालिकेचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:04 AM

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पालिकेची यंत्रणाही हे खड्डे बुजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, पावसामुळे खड्यांची संख्या वाढतच आहे. विमानतळाकडे जाताना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांना या खड्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे सहार विमानतळ रोड परिसरातील खड्डे तात्काळ भरावेत, असे निर्देश मुंबई महापालिकेने प्राधिकरणाला दिले आहेत. विमानतळ पालिकेच्या पश्चिम विभागाच्या रस्ते विभागाच्या उपायुक्तांनी तसे पत्र विमानतळ प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी आणि देखभाल विभागाला दिले आहे.

फोटो होताहेत व्हायरल-

१) समाज माध्यमांवरही खड्यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त्तांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना खड्डे शोधून, ते बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

२) तुम्हीही तुमच्या कार्यक्षेत्रातील खड्डे तात्काळ बुजवून घ्या, असे पालिकेने विमानतळ प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमच्या पथकाने विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली असता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्तेही उखडल्याचे आढळून आले आहे. मरोळ पाइप लाइन, आयटीसी मराठा हॉटेल, संतोषी मातानगर, पिलर क्रमांक १४, १८ आणि १९ येथेही खड्डे पडले आहेत. या खड्यांबाबत पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत.

'तातडीने कार्यवाही व्हावी'-

आम्ही तुम्हाला ज्या भागांत खड्डे पडले आहेत, त्या स्थळांची सविस्तर माहिती दिली आहे. त्या ठिकाणचे खड्डे येत्या २४ तासांत बुजवा आणि ही बाब तातडीचे आहे, हे समजा, असेही कळवण्यात आले आहे. खड्यांची छायाचित्रेही पालिकेने विमानतळ प्राधिकरणाला पाठवले आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाखड्डेअंधेरी