महापालिका म्हणते, ‘मंकीपॉक्स’ला घाबरू नका! ‘सेव्हन हिल्स’मध्ये १४ बेड राखीव, प्रशासन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:06 PM2024-08-23T12:06:48+5:302024-08-23T12:08:49+5:30
सध्या महापालिका हद्दीत ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण नाही. मात्र, परदेशातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पाकिस्तान आणि स्वीडनमध्ये ‘मंकीपॉक्स’ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतातही शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या महापालिका हद्दीत ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण नाही. मात्र, परदेशातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका संचलित सेव्हन हिल्स रुग्णालयात १४ रुग्णशय्या (बेड) असलेला कक्ष आरक्षित ठेवला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहनही महापालिकेने केले आहे.
जगातील काही देशांत ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा वेग आणि तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १८ ऑगस्टला रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विमानतळावर तपासणी सुरू-
‘मंकीपॉक्स’ संदर्भात बुधवारी विमानतळ आरोग्य अधिकारी, इमिग्रेशन, कार्यकारी आरोग्य अधिकारी यांची बैठक झाली. आरोग्य अधिकारी विभागामार्फत आफ्रिकन देशातून येणारे नागरिक तसेच इतर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
विलगीकरण केव्हा?
१) मंकीपॉक्स बाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात आणि घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवणे आवश्यक आहे. याठिकाणी स्वतंत्र वायूविजन व्यवस्था असावी. रुग्णाने मास्क घालणे गरजेचे आहे.
२) रुग्णाने पुरळ, फोड नीट झाकले जावेत, यासाठी लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पँट वापराव्यात. लक्षणानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संसर्गजन्य कालावधी-
अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांच्या खपल्या पडेपर्यंत किंवा पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.