Join us  

‘केईएम’च्या आवारातील डीनचा बंगला तोडू नका; उद्धवसेनेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 9:53 AM

केईएम रुग्णालयाच्या आवारातील अधिष्ठाता (डीन) यांच्या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या आवारातील अधिष्ठाता (डीन) यांच्या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांनी या वास्तूमध्ये मुक्काम केला होता. या वास्तूचे जतन व्हावे, यासाठी उद्धवसेनेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेने बंगला तोडण्यास मंजुरी दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा पक्षाच्या शिवडीतील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.  

उद्धवसेनेचे शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून बंगला  न तोडण्याची विनंती केली आहे. 

२०१८ ते २०१९ दरम्यान तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या निर्देशानुसार ‘केईएम’मधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी काही इमारती सी-१ व सी-२ वर्गवारीत घोषित झाल्या होत्या. प्रशासनाला डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करावयाची असेल, तर या वर्गवारीतील इमारती पाडून तेथे बहुमजली टॉवर उभारता येईल, याकडे पडवळ यांनी लक्ष वेधले आहे.

त्याचबरोबर टाटा रुग्णालयाच्या   परिसरातील ‘केईएम’ कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तोडून तेथेही कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी  निवासस्थाने बांधली जाऊ शकतात, यावर प्रशासनाने काम सुरू केले होते. मात्र नंतर तो प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला. विविध पर्याय खुले असताना अधिष्ठाता यांचा बंगला तोडून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा अट्टाहास पालिका प्रशासन का करत आहे, असा सवाल पडवळ यांनी या पत्रात विचारला आहे.

यंदाचे शतक महोत्सवी वर्ष -

२०२४-२५ हे वर्ष केईएम रुग्णालयाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने प्रशासन विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. अशावेळी ऐतिहासिक बंगला तोडल्यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे प्रशासनाने अडेलतट्टू भूमिका सोडून वारसा जपावा, असे आवाहन करतानाच प्रशासनाने धोरण न बदलल्यास मात्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पत्रात दिला आहे.

टॅग्स :मुंबईकेईएम रुग्णालय