आयुष्यमान भारत ई-कार्ड काढा, ५ लाखांपर्यंत उपचार मोफत; राज्यातील १ हजार रुग्णालयांत सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 10:49 AM2024-08-14T10:49:19+5:302024-08-14T10:51:06+5:30
अनेक रुग्णालयांत उपचारासाठी विशेषत: गंभीर आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनेक रुग्णालयांत उपचारासाठी विशेषत: गंभीर आजाराच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अनेकदा हा खर्च परवडणारा नसतो.त्यामुळे पैसे जमवताना त्यांच्या कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी कर्जही काढावे लागते. मात्र, जर रुग्णाकडे आयुष्यमान भारत ई-कार्ड असेल, तर त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार महाराष्ट्रातील एक हजार रुग्णालयांत या योजनेद्वारे मोफत मिळतात. त्यामुळे सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मुंबईकरांनी आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहून आयुष्यमान भारत ई-कार्ड काढणे गरजेचे आहे.
‘आयुष्मान भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. केंद्र शासन ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ राबवत आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू झाली असून, कार्डधारकाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या योजनेमध्ये एक हजार ३५६ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार सुरुवातीला पिवळ्या रेशन कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट केले होते. आता केसरी व पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबई व मुंबई उपनगरामध्ये या योजनेंतर्गत एकूण ५७ रुग्णालये अंगीकृत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात २ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र’ नावाची समिती नेमण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचा आढावा दौरा करून योजना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यमान भारत कार्डाचा उपयोग रुग्णांना हॉस्पिटलमध्ये एटीएम कार्डप्रमाणे ‘हेल्थ कार्ड’ म्हणून व्हावा, अशी संकल्पना आहे. - डॉ. ओमप्रकाश शेटे, प्रमुख, आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र शासन
१३ टक्के मुंबईकरांकडे कार्ड-
मुंबई शहर आणि उपनगरांत ८२ लाख ३१ हजार २३९ लाभार्थी असून, आतापर्यंत १० लाख ४० हजार ४८१ म्हणजे १३ टक्के आयुष्यमान भारत ई-कार्ड वितरित करण्यात आली आहेत.