Join us

रुळांजवळील गवतावर आता ड्रोनचा औषधी ‘उतारा’; मध्य रेल्वेने तुर्भेत घेतली चाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:01 AM

रेल्वे यार्ड आणि रुळांजवळ वाढलेले गवत ही रेल्वे प्रशासनासाठी नेहमीच  डोकेदुखी ठरते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे यार्ड आणि रुळांजवळ वाढलेले गवत ही रेल्वे प्रशासनासाठी नेहमीच  डोकेदुखी ठरते. अनेकदा या गवतामध्ये साप, विंचू, कीटक वावरत असतात. रेल्वे डब्यांच्या तपासणीसाठी यार्डातून बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि रुळांच्या देखभालीसाठी या गवताची पावसाळ्यापूर्वी आणि नंतर छाटणी केली जाते. 

मात्र  हे काम वेळखाऊ आहे. त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा अधिकचा वेळ खर्च होत असे. मात्र आता मध्य रेल्वे हे गवत नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे.  

मध्य रेल्वेने नुकतीच तुर्भे रेल्वे यार्डाजवळ ड्रोनच्या सहायाने गवतावर औषध फवारणीची चाचणी घेतली. चाचणीदरम्यान, १ किलोमीटरपर्यंतच्या पट्ट्यातील गवत नष्ट करण्यात आले. हे काम ड्रोनमुळे केवळ १५ मिनिटांत पूर्ण झाले. 

मात्र यासाठी आधी याला तास लागायचा. या तंत्रज्ञानामुळे ९० टक्के  पाण्याची बचत झाली असून, १८ टक्के अधिक प्रभावी परिणाम मिळाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या हे काम खासगी एजन्सीमार्फत प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

रेल्वे यार्ड आणि रुळांजवळील गवत नष्ट करण्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर करण्याची योजना आखत आहोत. तुर्भे येथे प्रायोगिक तत्त्वावर औषध फवारणी करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ, रसायन आणि वेळेची बचत होत आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान व्यापक प्रमाणात वापरण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. - स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

असे आहे हेक्सा कॉप्टर ड्रोन-

१) यामध्ये ४ नोझल आहेत जे ५  मीटर रुंदीच्या पट्ट्यामध्ये औषध फवारतात  

२)  १०, १६ आणि ३० लिटर क्षमतेचे द्रव कंटेनर उपलब्ध आहे.

३) सुमारे ४००० चौरस मीटर क्षेत्रफळ १५ मिनिटांत कव्हर  करते.

४) ओव्हरहेड वायर ओएचई मास्ट्स, सिग्नल पोस्ट्स आदी अडथळ्यांसाठी डिव्हाईस डिस्टन्स सेन्सर्सने सुसज्ज.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे