मुंबई : गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळेही मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यात जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाल्याने एकूण पाणीसाठा ७.१५ टक्के (एक लाख तीन हजार ५०३ दशलक्ष लिटर) इतका आहे.
२ जुलै २०२३ रोजी सातही जलाशयांत १५.४० टक्के (दोन लाख २२ हजार ८६८ दशलक्ष लिटर) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा सात टक्क्यांनी कमी आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास ही तफावत दूर होईल, अशी अपेक्षा पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष तर ठाणे, भिवंडीला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा धरणामधून केले जातो.
गेल्या तीन वर्षांची २ जुलैची स्थिती-
वर्ष दशलक्ष लिटर टक्के२०२४ १,०३,५०३ ७.१५ २०२३ २,२२,८६८ १५.४० २०२२ १,७०,५२० ११.७८
या पाच प्रमुख जलाशयांसह मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव अशा एकूण सात जलाशयांमध्ये पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक असते. दरम्यान, सध्या सात जलाशयांमध्ये मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ७.१५ टक्के इतका पाणीसाठा होता.