मुंबई : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन व पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत पालिकेकडून तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. एकूण २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी २२ मे पर्यंत १३ हजार ९२० मेट्रिक टन म्हणजे ५५ टक्के जलपर्णी काढण्यात आली आहे.
मात्र, या कामादरम्यान नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी पालिकेने घेतली असून, पक्ष्यांची घरटी तसेच त्यांचा विणीचा हंगाम लक्षात घेता जलवाहिनी मार्ग व भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) लगतची जलपर्णी काढण्याचे काम १० जूनपर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान, आदि शंकराचार्य मार्गाच्या बाजूची जलपर्णी काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्या निरीक्षणांनुसार, दरवर्षी १० जूनपर्यंतचा कालावधी हा जलचर पक्ष्यांचा प्रजोत्पादन अथवा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे जलचर पक्षी, मगर यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, ही प्रमुख हरकत अभ्यासकांनी नोंदविली होती. त्याची दखल घेत पालिकेने ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएचएनएस)ला प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची विनंती केली होती.
या अहवालानुसार जलवाहिनी मार्ग व आयआयटी, मुंबईच्या बाजूस पक्ष्यांची घरटी आढळली आहेत. त्यामुळे विणीचा हंगाम संपल्यानंतर तेथील जलपर्णी काढण्याची कामे करावीत, अशी विनंती पक्षी निरीक्षक व अभ्यासकांनी केली आहे. त्यानुसार पालिकेने त्या बाजूचे काम तात्पुरते थांबवले आहे. १० जूननंतर त्या बाजूचे काम पुन्हा सुरू केले जाणार आहे. संस्थेच्या पाहणी पथकात ‘बीएचएनएस’च्या नियामक मंडळाचे सदस्य देबी गोयंका, उपसंचालक राहुल खोत, पक्षीनिरीक्षक मैत्रेयी, उषा नुरनी यांचा समावेश होता.
जलपर्णी काढण्याच्या कामात तलावातील जलपर्णी व इतर तरंगत्या वनस्पती काढणे व त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावणे आदी बाबींचा समावेश आहे. तलावातील गाळ उपशाचे किंवा काठावरील झाडेझुडपे आदी काढण्याच्या बाबींचा त्यात समावेश नाही, ही बाब पालिकेने ‘बीएचएनएस’च्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
पक्ष्यांना धोका होणार नाही, याची काळजी-
पक्ष्यांच्या घरट्यांना मोकाट श्वान, भटक्या जनावरांचा धोका उद्भवतो. ही बाब लक्षात घेता पालिकेने आवश्यक उपाययोजना करावी, अशी विनंती ‘बीएचएनएस’ने केली आहे. त्याचाही विचार करून संबंधित खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वस्त करण्यात आले आहे.
काठावरची झुडपे काढणार नाही -
जलवाहिनी मार्गाच्या बाजूने पवई तलावाची पाहणी करताना शेकाट्या, बगळे, कमळपक्षी, पाणकोंबडी, बदक, टिटवी, अडई पक्षांचा अधिवास आढळला. या ठिकाणी हार्वेस्टर यंत्राद्वारे जलपर्णी काढण्यात येत असल्याने जलचर पक्ष्यांच्या विहारात व्यत्यय निर्माण होत असल्याचे लक्षात आले.
तलावाच्या काठावर शेकाट्या पक्ष्यांची घरटी असल्याचे पक्षीनिरीक्षकांना आढळले. त्यामुळे तेथील जलपर्णी काढताना घरटी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पालिकेने शक्यतो पोकलेनऐवजी हार्वेस्टर संयंत्राचा वापर करावा, अशी विनंती अभ्यासकांनी केली आहे.