सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:47 AM2024-08-09T09:47:53+5:302024-08-09T09:49:39+5:30

सायन पुलाच्या पाडकामामुळे सायन पट्ट्यातील वाहतूक धारावी आणि बीकेसीमधून वळवण्यात आली आहे.

in mumbai due to demolition of sion bridge 3 hours on road everyday due to traffic plight of passengers | सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल

सायन, बीकेसीमुळे रोज ३ तास रस्त्यावर; पुलाच्या पाडकामामुळे वाहतुकीत बदल, मुंबईकरांचे हाल

मुंबई : रस्त्यांवर पडलेले खड्डे, ठिकठिकाणची खोदकामे, ट्रिपल पार्किंग या समस्या मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेल्या असतानाच आता पाडकामासाठी बंद केलेल्या सायन रेल्वे पुलाने त्यात भर घातली आहे. सायन पुलाच्या पाडकामामुळे सायन पट्ट्यातील वाहतूक धारावी आणि बीकेसीमधून वळवण्यात आली आहे. त्याचा फटका बीकेसी, अंधेरी, सायन, माटुंगा आणि कुर्ल्यासह लगतच्या परिसरातील नागरिकांना बसत आहे. एलबीएस रोड, धारावी आणि बीकेसीमध्येच अडकून मुंबईकरांचे रोजचे तीन तास वाहतूक कोंडीत वाया जात आहेत. 

सायन रेल्वे स्थानक येथून कलानगर जंक्शनकडे जाणारी वाहतूक सायन रुग्णालयाकडून धारावीकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे बीकेसी कनेक्टर आणि एमटीएनएल जंक्शनवरून बीकेसी मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुलात वाहने अडकून पडत आहेत. यावर उपाय म्हणून आता बीकेसीमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 

वांद्रे-कुर्ला संकुल मार्गाने बीकेसी परिसरात जाणाऱ्या बसचालकांना एनएसई जंक्शन, भारतनगर जंक्शन, नाबार्ड जंक्शन आणि डायमंड जंक्शन येथे वळण घेण्याऐवजी पुढे प्लॅटिना जंक्शन येथे वळण घेत बीकेसीमध्ये जावे लागत आहे. असा मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने नागरिकांचा खूप वेळ प्रवासात जात आहे.

धारावीमधील रस्ते अरुंद आहेत. तेथून जाणारी वाहने नेहमीच कोंडीत अडकतात. आता सायन पूल बंद केल्याने धारावीतील रस्त्यावर वाहनांचा ताण वाढला आहे. बेस्ट बस, खासगी वाहनांची वर्दळ वाढल्याने टी जंक्शनपासून ते सायन रुग्णालय हा प्रवास पाऊण तासावर गेला आहे. 

उद्या रास्ता रोको आंदोलन-

१)  सायन पूल तातडीने उभारावा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी पूल उभारण्याच्या प्रमुख मागणीसाठी खासदार वर्षा गायकवाड आणि खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी १०:३० वाजता सायन पश्चिमेकडील सागर हॉटेलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि धारावी बचाव आंदोलनतर्फे हे आंदोलन होणार आहे.

एलबीएसवर लांबच लांब रांगा-

बीकेसीमधून कुर्ला स्थानकाकडे जाताना कुर्ला डेपो येथे एलबीएसवर बाहेर पडणाऱ्या वाहनांची कोंडी होते. सिग्नल, खड्ड्यांमुळे वाहतुकीच्या वेगावर परिणाम होऊन बीकेसी एमटीएनएलपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, तर एलबीएसवर कुर्ला कोर्ट आणि एससीएलआरच्या सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात. त्याचा फटका एलबीएसवरील कमानी जंक्शनपर्यंतच्या वाहनांचा बसतो.

हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शौचालये-
 
सायन, कुर्ला, धारावी आणि वांद्रे परिसरातील रस्त्यांवर हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच सुलभ शौचालये आहेत. कुर्ला डेपो आणि सायन रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या सुलभ शौचालयातील परिस्थिती पाहून नागरिक तिकडे जाणार नाहीत, अशी अवस्था आहे. धारावी, बीकेसी परिसरातील सुलभ शौचालयांचे अंतर मोठे आहे. अशावेळी आजाराने त्रस्त असलेली एखादी व्यक्ती कोंडीमध्ये अडकली तर अडचणीचे होऊन बसते.

प्रवासासाठी दीड तास वाढला -

एलबीएसहून धारावी आगारमार्गे टी जंक्शन आणि मग ९० फूट रोडवरून सायन रुग्णालयाकडे बाहेर निघतानाचा बेस्ट बसचा तीन तासांचा प्रवास साडेचार तासांवर गेला आहे. या प्रवासासाठी दीड तास अधिक लागत असल्याचे बेस्ट वाहन चालक आणि वाहकांनी सांगितले. 

दुपारी दोनलाही रखडपट्टी-

१)  एलबीएसवर बीकेसीतूनही मोठ्या प्रमाणावर वाहने येत आहेत. शिवाय एलबीएसवरून होणारी नेहमीची वाहतूकही आहेच. बीकेसी कनेक्टरमुळे वाहतूक सुलभ होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात बीकेसीमध्ये वाहनांची भर पडत आहे. भारतनगर जंक्शनवर दुपारी दोनच्या सुमारासही कोंडीत होत असल्याचे चित्र आहे.

१ ऑगस्टपासून सायन रेल्वे पूल बंद करण्यात आला आहे. जूना पूल पाडून नवा पूल बांधण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सायन रेल्वे पूल बंद करण्यात आल्याने सर्व वाहतूक धारावीतून वळवण्यात आली आहे. परिणामी, अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी होत आहे. 

सायनहून अंधेरी पूर्वेचा साकीनाका गाठण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागत आहे. तेवढ्या वेळेत कुर्ल्याहून सुटलेली लोकल बदलापूरला पोहोचते. त्या लोकलमधील प्रवासी घरी पोहोचले तरी कुर्ला ते साकीनाका पट्ट्यातील प्रवासी मात्र कोंडीतच अडकलेले असतात, अशी खंत सायन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. 

Web Title: in mumbai due to demolition of sion bridge 3 hours on road everyday due to traffic plight of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.