Join us

मुसळधार पावसामुळे महापालिकेचे नियोजन गेले पाण्यात; प्रशासनावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:00 AM

मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहरात बुधवारी सायंकाळी सरासरी १०५ टक्के, तर पूर्व-पश्चिम उपनगरात ९६ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे हिंदमाता, कुर्ला रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, शिवडी रेल्वे स्थानक, साईनाथ सब वे मालाड आदी सखोल भागांमध्ये पाणी साचले. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर माजी विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून टीका होत आहे. दरम्यान, प्रत्येक विभागांतील पाणी साचलेल्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती घेऊन, चौकशी करून अहवाल सादर करावेत, अशा सूचना प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालिकेने बुधवारी सायंकाळी पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांना सज्ज केले. मात्र, तरीही पालिकेचे प्रयत्न अपुरे पडल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. मुंबईत पावसाचा जोर वाढला आणि त्याचवेळेस समुद्राला भरती आली, तर पाणी साचते, असा एक मुद्दा मांडला जातो, परंतु बुधवारी समुद्राला भरती नसतानाही सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या पावसात सखल भागांपेक्षा आणखी काही ठिकाणे पाणी साचले असू शकते, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणांचा पालिकेने अभ्यास केला आहे. भविष्यात असे पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन आणि व्यवस्था यामुळे बुधवारच्या पावसात मुंबईकरांना हाल सोसावे लागले. एखाद्या गटारावरील झाकणही पालिका योग्य पद्धतीने लावत नसेल आणि त्यामुळे मृत्यू होत असेल, तर ही शरमेची बाब आहे. या सगळ्या नियोजनावर मागील कित्येक वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चूनही अशी परिस्थिती असेल, तर हे पालिकेचे अपयश आहे. पालिका एखाद्या निर्दोष व्यक्तीचा जीव वाचवू शकत नसेल, तर सौंदर्यीकरणावर १,७०० कोटी खर्च करून उपयोग काय? - रवी राजा, माजी विरोधी पक्षनेता 

नागरी व्यवस्थापनात पालिका अपयशी ठरली आहे. वाढत्या झोपडपट्ट्या आणि शहरीकरण यामुळे शहराच्या समस्यांमध्ये वाढ होत असून नागरी व्यवस्थापन ढासळत असल्याची ही चिन्हे आहेत. यावर आवश्यक ती कारवाई तत्काळ व्हायला हवी. - गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन

पाण्याचा निचरा होण्यास झाला विलंब-

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत आवश्यक ठिकाणी पंपाची व्यवस्था केली जाते. यंदाच्या पावसात मुंबईच्या सर्व भागांतील पंप कार्यान्वित असल्याची माहिती पालिकेने दिली.  मात्र, बुधवारी पावसाचा जोर अधिक असल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाऊस