Join us

दसरा-दिवाळीत फुकट्या प्रवाशांची खैर नाही; विशेष तपासणीसाठी रेल्वे बोर्डाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:33 AM

भारतीय रेल्वे बोर्डाने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्याचे आदेश भारतातील सर्व रेल्वे विभागांना दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय रेल्वे बोर्डाने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्याचे आदेश भारतातील सर्व रेल्वे विभागांना दिले आहेत. १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दोन पंधरवड्याच्या कालावधीत ही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्करोगग्रस्त अशा कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना प्रवासी विपणन विभागाचे कार्यकारी संचालक शिवेंद्र शुक्ला यांनी देशातील सर्व प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांना केल्या आहेत.

३ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. त्यानंतर येणारा दसरा आणि दिवाळी या सणांना लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच लोकल यांना मोठी गर्दी असते. या सर्व गाड्यांमध्ये फुकट्या आणि अनधिकृतरीत्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. अशा प्रवाशांवर नियंत्रण ठेवून ट्रेनमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी तसेच वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये या उद्देशाने ही विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. या विशेष मोहिमेमुळे उत्सवाच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक, कर्करोगग्रस्त अशा कोट्याचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर आळा बसेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी सूचना-

१) स्थानकातील आवश्यकतेनुसार अतिरिक्त खिडक्या सुरू कराव्यात.

२) स्थानकावर उपलब्ध असलेले एटीव्हीएम सुस्थितीत ठेवावे.

३) डिजिटल माध्यमाने अर्थात युपीआयने पैसे भरणे, युटीएस ॲप आणि आयआरसीटीसी अशा माध्यमांबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करावी.

टॅग्स :मुंबईरेल्वे