'झिका' आला; आरोग्य सांभाळा; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:33 AM2024-07-11T11:33:08+5:302024-07-11T11:37:09+5:30
राज्यात गेल्या दोन महिन्यांत 'झिकाचे' आठ रुग्ण आढळले आहेत.
मुंबई: राज्यात गेल्या दोन महिन्यांत 'झिकाचे' आठ रुग्ण आढळले आहेत. 'झिका' हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो.
आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी-
१) एडिस डास सहसा दिवसा चावतात. काही दिवसांपूर्वीच झिंकाच्या वाढत्या नोंदींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत.
२) सध्या तरी 'झिका'वर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
३) भारतामध्ये २०१६ मध्ये गुजरात राज्यात प्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. तेव्हापासून, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या इतर अनेक राज्यांतून अनेक रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद आहे
या आजाराच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, गुलाबी पुरळ अंगावर उठणे अशा प्रकरची लक्षणे दिसून येतात. या आजाराचे निदान वैद्यकीय सल्ल्यानेच केले जाते. त्यामुळे स्वतःहून कोणतेही उपचार करू नका. वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेतल्यास भविष्यात होणारी गुंतागुंत टाळता येऊ शकते. - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे.जे. रुग्णालय
नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी-
१) 'झिका'बाधित गर्भवतींवर लक्ष ठेवावे. त्यांची सतत तपासणी करावी.
२) रुग्णालयांनी आपली संकुले एडिसमुक्त ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
३) राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम सुरू असलेल्या जागा, संस्था या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट कराव्यात.
४) रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवावेत.
५) 'निका' विषयी समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी.