‘एकच लक्ष्य, एक लक्ष पॅटर्न’ यंदाही हिट; पालिका शाळांत एक लाख नवे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:52 AM2024-08-12T10:52:47+5:302024-08-12T10:54:16+5:30
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाही ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम राबविली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाही ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम राबविली होती. एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या इयत्तेत एक लाखाहून अधिक नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता साडेतीन लाखांवर गेली आहे.
पालिका शाळेत मिळणाऱ्या २७ मोफत वस्तू, मोफत ‘बेस्ट’ प्रवास, दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत शिक्षणामुळेच विद्यार्थीसंख्या वाढत असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढल्याने पालिका शाळांतील पटसंख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी २०२२ पासून ‘मिशन ॲडमिशन’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’ या मोहिमेत शाळा सुरू होण्याआधी एक लाख विद्यार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जात आहे. यामध्ये पहिल्याच वर्षी तब्बल सव्वालाख विद्यार्थी संख्या वाढली होती, तर यावर्षी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांच्या पाठपुराव्याने राबवलेल्या ‘मिशन ॲडमिशन’मध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी वाढले आहेत.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मोफत दिले जाते. विविध प्रकारच्या आंतरशालेय स्पर्धा घेण्यात येतात. सोबतच सुसज्ज इमारत, क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, सुरक्षारक्षक, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ॲस्ट्रोनॉमी लॅब, ग्रंथालय, टॅब, शालेय स्टेशनरी दिली जाते. अनेक नवीन आणि वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा पालिका शाळांकडे वाढला आहे. - राजू तडवी, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, मुंबई महापालिका.