Join us

निवडणुकीची ड्युटी, मग शिकवायचे कधी? पालिका शाळांतील शिक्षकांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 10:32 AM

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने जुलैमध्ये घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने जुलैमध्ये घेतला होता. मात्र, आता पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करत तब्बल दोन हजार शिक्षकांना विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सध्या राज्यात मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मुंबईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तर शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. शहर आणि उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कामासाठी पालिकेकडे दोन हजार कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. त्यापैकी शहर भागासाठी ६००, तर उपनगरसाठी १,२०० कर्मचारी मागवले आहेत. 

पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत नुकतेच परिपत्रक काढले असून, शिक्षण विभागातील दोन हजार कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने शिक्षकांच्या नावाने आदेश दिले आहेत. शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कामे न देण्याबद्दल शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती-

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून हे कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील तीन दिवस निवडणुकीचे काम, तर तीन दिवस पालिकेच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. निवडणूक कामासाठी पाठविण्यात येणारे कर्मचारी गुरूवार ते शनिवार या दिवशी निवडणुकीची कामे करतील. सोमवार ते बुधवार पालिकेतील कार्यालयात उपस्थित राहून कामे पार पाडतील, असेही आदेश पालिकेने काढले आहेत.

शिक्षकांमध्ये नाराजी-

१) लोकसभा निवडणुकीवेळीही शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लावल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. नंतर शिक्षकांना या कामातून वगळण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर आठवड्याचे तीन दिवस निवडणुकीचे काम आणि तीन दिवस शाळा असा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. 

२) आता पुन्हा त्याच शिक्षकांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. आधीच पालिकेकडे शिक्षकांची कमतरता आहे. नवीन भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यात असलेले शिक्षक निवडणूक कामावर पाठवल्यास शिकवायचे कधी? असा सवाल शिक्षकांनी केला आहे.

टॅग्स :मुंबईशिक्षकनिवडणूक 2024