इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि प्रदूषण कमी करा; मुंबईकरांचा वाहनांकडे कल वाढतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:29 AM2024-07-03T11:29:40+5:302024-07-03T11:31:13+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न केले जात असतानाच मुंबईकरांकडूनही इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत यास हातभार लावला जात आहे. याचा परिपाक म्हणून मुंबईतल्या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची संख्या ११ हजारांच्या आसपास पोहोचली असून, ही वाहने चार्ज करण्यासाठी वीज कंपन्याही हातभार लावत असल्याने मुंबईकरांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. सीएनजी, इंधनाचे दर परवडत नाहीत. त्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. सरकारसह खासगी कंपन्याही इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहेत. बेस्टच्या बहुतांशी बस इलेक्ट्रिक असून, खासगी कंपन्याही इलेक्ट्रिक दुचाकींना प्राधान्य देत आहेत.मुंबईत आजघडीला २२ हजार ५५४ इलेक्ट्रिक दुचाकी आहेत, तर १० हजार ८९३ हून अधिक चारचाकी इलेक्ट्रिक वाहने आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपन्यांनीही इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जर स्टेशन उपलब्ध करून दिली आहेत. या चार्जर स्टेशनची संख्याही वाढत आहे.
शेअर चार्जिंग उपक्रम सुरू-
टाटा पॉवरने हायवे, हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, कार्यालये, गृहसंकुले येथे चार्जर बसवले आहेत. हे चार्जिंग पॉइंटस् हरित ऊर्जेवरील आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटीने गृहनिर्माण संस्थांमध्ये शेअर चार्जिंग उपक्रम सुरू केला आहे. फास्ट चार्जिंग पॉइंटद्वारे तीन ते साडेतीन तासांत एक वाहन चार्ज होते. सर्वसाधारण चार्जिंग पॉइंटद्वारे एक वाहन चार्ज करण्यास सहा ते तास तास लागतात.
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येत आहे. २०३० पर्यंत भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वार्षिक विक्री १ कोटींपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.