स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा; प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचे पाऊल, धूर कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:36 AM2024-06-25T09:36:31+5:302024-06-25T09:37:06+5:30

मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात नऊ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे.

in mumbai environmentally friendly 9 cremation systems in cemeteries municipality step for pollution relief | स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा; प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचे पाऊल, धूर कमी होणार

स्मशानात पर्यावरणपूरक दहन यंत्रणा; प्रदूषणमुक्तीसाठी पालिकेचे पाऊल, धूर कमी होणार

मुंबई : प्रदूषणमुक्तीसाठी मुंबई महानगरपालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात नऊ ठिकाणी हे तंत्रज्ञान पालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे.

वायुप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी या यंत्रणेचा वापर संपूर्ण मुंबई महानगरामध्ये करण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. 

मुंबईत ‘या’ ठिकाणी होणार वापर?

मुंबई शहरात भोईवाडा स्मशानभूमी, गोवारी स्मशानभूमी (वडाळा), वैकुंठधाम स्मशानभूमी (रे रोड) तसेच पूर्व उपनगरांमध्ये टागोर नगर स्मशानभूमी (विक्रोळी), देवनार कॉलनी स्मशानभूमी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरामध्ये बाभाई स्मशानभूमी (बोरिवली), ओशिवरा स्मशानभूमी, शिवधाम स्मशानभूमी (गोरेगाव) आदी ठिकाणी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

१० ठिकाणी विद्युतदाहिनी-

सध्या १० स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि १८ ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. २०२० साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. नऊ ठिकाणी ही पद्धती अंमलात आणण्यासाठी निविदा प्रक्रिया यांत्रिकी, विद्युत विभागामार्फत सुरू आहे. दहनासाठी लाकडाऐवजी पर्यायी इंधन म्हणून पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी १४ स्मशानभूमी निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळतानाच वायुप्रदूषण टाळण्यासाठीही मदत होत आहे.

अशी आहे पर्यावरणपूरक यंत्रणा-

१)  मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळे कमीत कमी लाकडांचा वापर हा दहनाच्या प्रक्रियेत होतो. 

२)  प्रत्येक मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱ्या ३५० ते ४०० किलो लाकडांच्या तुलनेत १०० ते १२५ किलो इतक्या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे सरासरी २५० किलो इतक्या लाकडाची बचत दहनाच्या प्रक्रियेत होईल. 

३) परिणामी कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यासाठी यंत्रणा उपयुक्त आहे. धार्मिक विधींसाठीचा विचार यावेळी करण्यात आला आहे. ट्रॉलीच्या बाहेरील सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य आहे.

धूर कमी होणार -

१) ऊर्जा वहनासाठी तसेच कमीत कमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल अशा पद्धतीची रचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. 

२) वॉटर स्क्रबर, सायक्लोनिक सेपरेटरमध्ये प्रदूषकांमधील कण व विषारी वायू काढून टाकले जातात.  मुंबईतील नऊ ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे.

Web Title: in mumbai environmentally friendly 9 cremation systems in cemeteries municipality step for pollution relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.