Join us  

तब्बल ७५,०८२ अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणींना मिळणार एक संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:01 AM

राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ॲपला  मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ॲपला  मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेंतर्गत मुंबई उपनगरात एकूण ३ लाख ८७ हजार ९७३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ लाख ४६ हजार ८९७ अर्ज मंजूर करण्यात आले, तर मुंबई शहरात एकूण १ लाख ७१ हजार ७१५ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९९ अर्ज मंजूर करण्यात आले. 

मुंबई उपनगरात ४१ हजार ७६ अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ते रिजेक्ट करण्यात आले, तर मुंबई शहरात २४ हजार ६ अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ते रिजेक्ट करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. अर्जात दुरुस्ती करण्याची एकच संधी असून ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला असेल अशा सर्व लाभार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता करून पुन्हा आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

पर्यावरणाचे रक्षण आणि पाण्याची झाली बचत-

देशभरात कोणत्याही योजनेची अंमलबजावणी थेट डिजिटल ॲप्लिकेशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हे डिजिटल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. या योजनेची अंमलबजावणी डिजिटल ॲप्लिकेशनद्वारे केल्याने पाच पानांचा अर्ज भरून घेण्यासाठी ६ कोटी ८५ लाख पाने लागली असती. एका झाडापासून अंदाजे १० ते २० हजार कागदी पाने तयार होतात. त्यामुळे डिजिटल अंमलबजावणीमुळे अंदाजे ४ हजार ५६७ झाडे वाचली आहेत. तसेच या योजनेसाठी कागद निर्मितीसाठी  ६८.५ करोड लिटर पाण्याचीही बचत झाली.

बहिणींनो,पैसे देऊ नका, स्वतः भरा अर्ज-

१)ttps://ladakibahin.Maharastra.gov.in या पोर्टलवर लाभार्थी स्वतः अर्ज भरू शकतात. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. 

२) प्रक्रिया बिनचूक करण्यासाठी एकच संधी आहे. मोबाईलवरून स्वतःचा फॉर्म भरला आणि त्या प्रस्तावात स्पष्ट फोटो नाही, आधार कार्डवर संपूर्ण नाव नाही, हमीपत्र जोडायचे राहिले आहे.

३) या कारणांस्तव फॉर्म छाननी अधिकारी फॉर्म रिजेक्ट करतो. तसा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येतो. 

४) मग लाभार्थ्याला पुन्हा बिनचूक अर्ज करण्याची संधी प्राप्त होते.

टॅग्स :मुंबईराज्य सरकारसरकारी योजना