Join us

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 10:03 AM

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली. पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक झालेली नाही. सगळा कारभार प्रशासन चालवत आहे. लोढा यांनी पालिका आयुक्तांसमवेत पक्षाच्या माजी नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. पालिका प्रशासन व लोकांच्या समस्या याबाबत समन्वय साधण्यासाठी बैठक घेतल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. 

बैठकीत मुंबईतील शौचालय दुरुस्ती अथवा पुन:र्बांधणीबाबत होणारा विलंब, काही ठिकाणी कार्यरत न झालेला  आपला दवाखाना, उद्यानांचे सुशोभीकरण, बंद रुग्णालये, प्रसूतिगृहे, रस्त्यांची कामे, खड्डे, आदींवर चर्चा झाली. 

सहायक आयुक्तांचा व्हीसीद्वारे सहभाग-

१) २४ वॉर्डांतील सहायक आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)द्वारे बैठकीत सहभागी झाले होते. विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश लोढा यांनी प्रशासनाला दिले. 

२) बैठकीस भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, कमलेश यादव, अभिजित सामंत, राजेश्री शिरवडकर, बिंदू त्रिवेदी, दीपक तावडे, आदी ज्येष्ठ नगरसेवकांसह एकूण ६० नगरसेवक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवकही गाऱ्हाणी मांडण्यासाठी पालिकेत आले होते.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाभाजपामंगलप्रभात लोढा