मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या वाट्याला नरकयातना कायम असून, विविध स्थानकांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापैकी एक आहे घाटकोपर स्थानक. या स्थानकात गर्दीत दिवसागणिक वाढ होत आहे. फलाट क्रमांक ४ वर सीएसएमटीकडे सरकता जिना नाही. लिफ्ट असूनही नसल्यासारखी आहे. या गैरसोयीकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे.
कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांत सकाळी, सायंकाळी तुडुंब गर्दी होते. कुर्ला स्थानकावरून अंधेरी आणि बीकेसी गाठणारी प्रवासी संख्या मोठी आहे, तर घाटकोपर स्थानकावरून साकीनाका आणि अंधेरी गाठणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे.
दादरला वळसा घालून अंधेरीला जाण्याऐवजी घाटकोपरला उतरून मेट्रोने अंधेरीला जाण्यास प्रवासी प्राधान्य देत आहेत. याव्यतिरिक्त साकीनाका, मरोळ, चकाला येथे जाण्यासाठी कुर्ल्याऐवजी घाटकोपर स्थानकाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काही वर्षांपासून घाटकोपर स्थानकावरील गर्दीत वाढ होत आहे. वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यापासून घाटकोपर रेल्वे स्थानकावर ताण येत आहे.
...तर सुखकर प्रवास
१) घाटकोपर येथून प्रवास करणारे दिनेश हळदणकर यांनी यासंदर्भात सांगितले की, घाटकोपर स्थानकात फलाट क्रमांक ४वर सीएसएमटीकडील दिशेला सरकते जिने नाहीत.
२) पादचारी पूल जवळ नसल्याने प्रवाशांचे विशेषकरून महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. मेट्रो येथूनच सुरू होत असल्याने ६ डबे मागे चालत यावे लागते. येथे लिफ्टची व्यवस्था आहे.
३) ऐन पिकअवरला ही सेवा तोकडी पडते. त्यामुळे डाउन आणि अप असे दोन्ही दिशेला सरकते जिने बांधले पाहिजेत. शिवाय फलाटही अरुंद आहे. प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष दिले तर प्रवाशांच्या अडचणी सुटण्यास मदत होईल.