Join us  

अटल सेतूचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे एनसीपीएमध्ये प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:44 AM

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने देशातील सर्वांत लांब सागरी सेतूचे दर्शन घडविणारे ‘ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ : द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स’ हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे.

मुंबई : नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने देशातील सर्वांत लांब सागरी सेतूचे दर्शन घडविणारे ‘ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ : द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स’ हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीत आयोजित केेलेले हे प्रदर्शन ३१ जुलैपर्यंत दुपारी १२ ते ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एनसीपीएचे अध्यक्ष खुशरु एन. सॅनटूक आणि जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांच्या उपस्थितीत बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘अटल सेतू हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून त्यातून मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचे प्रदेश जोडले जाऊन तेथील आर्थिक विकास साध्य होणार आहे. 

संस्मरणीय अनुभव-

१) संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास, शाश्वत आणि नावीन्यपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वचनबद्धता प्रतिबिंबित करणारी छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. 

२) अटल सेतू मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी आणि शाश्वत विकासामध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी हे प्रदर्शन संस्मरणीय अनुभव असेल,’ असे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नमूद केले.

आतापर्यंतचा प्रवास-

अटल सेतू बांधताना वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, पर्यावरणीय बाबी टिपणारी दृश्ये, अभियांत्रिकी अविष्कार, पहिल्या खांबापासून सर्वांत लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकच्या उभारणीपर्यंतचा प्रवास तसेच यादरम्यान समोर उभी ठाकलेली आव्हाने यामध्ये छायाचित्रांद्वारे दाखवण्यात आली आहेत. त्याचबरोबर अटल सेतूचा लोकार्पण सोहळा छायाचित्रांद्वारे अनुभवता येईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबईराज्य सरकार