जुहू, वर्सोवा कनेक्टरचा लवकरच विस्तार; वाहतूककोंडी टळणार; प्रवास होणार सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:13 AM2024-07-31T10:13:36+5:302024-07-31T10:14:54+5:30

वांद्रे ते वर्सोवादरम्यान उभारण्यात येत असलेल्या सागरी सेतूच्या जुहू आणि वर्सोवा कनेक्टरचा आता पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार केला जाणार आहे.

in mumbai expansion of juhu versova connector soon traffic congestion will be avoided travel will be smooth | जुहू, वर्सोवा कनेक्टरचा लवकरच विस्तार; वाहतूककोंडी टळणार; प्रवास होणार सुसाट

जुहू, वर्सोवा कनेक्टरचा लवकरच विस्तार; वाहतूककोंडी टळणार; प्रवास होणार सुसाट

मुंबई : वांद्रे ते वर्सोवादरम्यान उभारण्यात येत असलेल्या सागरी सेतूच्या जुहू आणि वर्सोवा कनेक्टरचा आता पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत विस्तार केला जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे पश्चिम उपनगरातील जुहू आणि वर्सोवा भागात होणारी संभाव्य कोंडी वेळीच ओळखून त्यावर उपाय योजला जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उपाययोजना आखल्या आहेत. 
वांद्रे-वर्सोवा हा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी एमएसआरडीसीकडून १७.७ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यात येत आहे. या सागरी मार्गावर एकूण आठ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किलोमीटरचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जात आहे. पश्चिम किनाऱ्यावरील नरिमन पॉइंट ते विरारदरम्यान वाहतूक वेगवान करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांतील हा एक प्रमुख सेतू आहे. 

सरकारची मान्यता-

१) वांद्रे ते वर्सोवादरम्यान उभारल्या जाणाऱ्या सागरी सेतूला विविध ठिकाणी स्थानिक भागांत वाहनांना उतरता यावे, यासाठी कनेक्टर दिले जाणार आहेत. 

२) कार्टर रोड, जुहू आणि वर्सोवा भागात हे कनेक्टर दिले जाणार आहेत. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने जुहू आणि वर्सोवा येथे येण्याची शक्यता आहे. 

३) परिणामी या भागात कोंडी होऊन वाहनांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर जुहू आणि वर्सोवा कनेक्टरचा विस्तार करण्यात येणार आहे. 

४) राज्य सरकारने त्याला मान्यता दिली असून, त्यासाठी अतिरिक्त २००२ कोटींचा खर्च येणार आहे.

असा होणार विस्तार -

जुहू येथील कनेक्टर यापूर्वी गझधरबंद येथे येणार होता. मात्र, आता तो पुढे जुहू तारा रोडनजीक दौलतनगर जंक्शनला जोडला जाणार आहे. या कनेक्टरचा १,२५० मीटरने विस्तार केला जाईल. यातून वाहनांना थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर विनाअडथळा जाता येईल. 

वर्सोवा येथील कनेक्टर यापूर्वी नाना-नानी पार्कजवळ येणार होता. मात्र, या कनेक्टरमुळे परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता होती. त्यामुळे आता वर्सोवा कनेक्टरचा विस्तार जुहू-वर्सोवा लिंक रस्त्यावरील वृंदावन गुरुकुलपर्यंत केला जाणार आहे. या कनेक्टरचा १७५० मीटरने विस्तार केला जाणार आहे. त्यातून पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचण्याचे वाहनांच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. 

१) १,२५० मीटरने कनेक्टरचा विस्तार होणार असून, जुहूतील दौलतनगर जंक्शनला जोडला जाणार आहे. 

२) प्रकल्प विस्तारासाठी खर्च- २००२ कोटी 

३) १,७५० मीटरने कनेक्टरचा विस्तार होणार असून, वर्सोवा येथील वृंदावन गुरुकुलपर्यंत जाता येणार आहे.

Web Title: in mumbai expansion of juhu versova connector soon traffic congestion will be avoided travel will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.