'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:50 AM2024-08-06T10:50:34+5:302024-08-06T10:51:36+5:30

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे.

in mumbai extension of metro 11 to colaba it will run through byculla nagpada bhendi bazaar and crawford market area | 'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

मुंबई : वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. आता ही मेट्रो मार्गिका भायखळा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट परिसरातून धावणार आहे. तसेच ही मेट्रो मार्गिका पुढे कुलाबा येथे जोडण्याचे प्रस्तावित असून त्यादृष्टीने या नव्या संरेखनाची पडताळणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. 

कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत सीएसएमटी येथे पोहोचता यावे यासाठी वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार ही मेट्रो मार्गिका मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून धावणार होती. ही जुन्या मार्गिकेची १२.७ किमी लांबी होती. तसेच त्यावर ११ स्थानके प्रस्तावित होती. त्यामध्ये भक्तीपार्क, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंदर, कोल बंदर, दारुखाना, वाडीबंदर, क्लॉक टॉवर, कर्नाक बंदर आणि सीएसएमटी स्थानके प्रस्तावित होती. 

१८ किमी मार्गावर जिओ टेक्निकल तपासणी सुरू-

१) मुंबई पोर्ट ऑथोरिटीच्या जागेतून ही मेट्रो जाणार होती. मात्र, त्या भागात निवासी इमारती कमी आहेत. तसेच एमबीपीएची जागा मिळण्यात अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर या मेट्रोचा मार्ग बदलण्याचा विचार सुरू आहे.

२) आता ही मेट्रो गर्दीच्या भागातून धावणार आहे. त्यादृष्टीने या नव्या संरेखनातील संपूर्ण १८ किमी मार्गावर जिओ टेक्निकल तपासणी सुरू केली जाणार आहे. एमएमआरसीने त्याचा नकाशा जारी केला आहे.

या भागातून मेट्रो धावणार-

आणिक बस डेपो, वडाळा डेपो, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केड, सीएसएमटी, हार्मोनियम सर्कल, कुलाबा या भागातून मेट्रो धावणार आहे. तिची सुसाध्यता तपासण्याच्या अनुषंगाने आता जिओ टेक्निकल सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

नवी मार्गिका १८ किमी लांबीची? 

दरम्यान, ही मार्गिका १८ किमी लांबीची असेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी मेट्रो ११ मार्गिकेची लांबी १२.७ किमी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, आता तिच्या संरेखनातील बदलाला मंजुरी मिळाल्यास या मेट्रो मार्गिकेची लांबी १८ किमी असेल, असे सूत्रांनी नमूद केले. 

Web Title: in mumbai extension of metro 11 to colaba it will run through byculla nagpada bhendi bazaar and crawford market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.