Join us  

‘ओटीपी’द्वारे मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये हडप; इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:20 AM

मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई : मोबाइलमधील ओटीपीचा वापर करत मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार जयचंद निसार (४५) हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या वांद्रे पूर्व कार्यालयात आफताब शेख (४५) हा इंजिनियर गेल्या तीन वर्षांपासून काम करतो. निसार यांच्या कंपनीत काम करणारी अकाउंटंट सुटीवर गेल्यानंतर शेख अकाउंटची कामेही पाहतो. त्यामुळे त्याला कंपनीचे बँक अकाउंट डिटेल, यूजर आयडी आणि पासवर्ड माहीत आहेत. 

निसार यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या आई रुपादेवी (७४) यांच्या नावावर वांद्रे परिसरात असलेली खोली शेखचा मित्र शैलेश गुप्ता याला विकण्यासाठी करारनामा करण्यात आला होता. त्यासाठी पाच लाख रुपयेही गुप्ताने तक्रारदाराला दिले होते. तर उर्वरित रक्कम वर्षभरात देण्याचे ठरले होते. नंतर गुप्ताने त्याला खोली नको असल्याचे निसारला सांगितले. मात्र १६ जून रोजी दुपारी ४:३० वाजता निसार यांच्या कार्यालयात गुप्ता हा अन्य सात ते आठ मित्रांसोबत आला. 

... असा झाला उलगडा

गुप्ताने निसारला दिलेल्या पैशाबाबत विचारणा करून धमकावण्याचा प्रयत्न केला त्याकडे  निसारने दुर्लक्ष केले. काही वेळाने निसार यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सुशांत खैरे याने त्यांना कळवले की, गुप्ता आणि त्याचे साथीदार शेखला सोबत घेऊन गेले आहेत. ते ऐकल्यावर घाबरलेल्या निसार यांनी खेरवाडी पोलिसात धाव घेतली. तितक्यात त्यांच्या बँक खात्यातून ३० लाख शेखच्या लोन खात्यात जमा झाल्याचा मेसेज निसारला आला. तेव्हा शेख याने निसार यांचा ओटीपी वापरून हे पैसे काढल्याचे उघड झाले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसधोकेबाजी