Join us

आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 9:46 AM

चार रुग्णालयांच्या विस्तारामुळे रुग्णांना मिळणार माेठ्या प्रमाणात दिलासा.

मुंबई :मुंबई महापालिकेच्या वांद्रे भाभा, बोरिवली भगवती, मुलुंड एम. टी. अगरवाल आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयांचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त दोन हजार बेड  उपलब्ध होणार आहेत. हे  बेड प्रामुख्याने अतिदक्षता विभागासाठी वापरले जातील. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होताना बेडची कमतरता ही समस्या काही प्रमाणात कमी होण्याची आशा आहे. रुग्णालयांच्या विस्तारामुळे वेळीच उपचार मिळाल्याने आजारपणातून चुटकीसरशी रुग्ण बरे होतील. 

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे अनेकदा बेड उपलब्ध होण्यात अडचणी येतात. अनेक रुग्णांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता असते. मात्र, या विभागातील बेडची संख्या मर्यादित असल्याने तिथेही बेड उपलब्ध  होताना अडचण येते. सर्वसाधारण वॉर्डातही रुग्णाचा   वाढता  ओघ असल्याने या वॉर्डातही बेडची कमतरता जाणवते. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा मिळवताना यातायात करावी लागते. उपनगरातील रुग्णालयांचा विस्तार केल्यामुळे या भागातील लोकांना के. ई. एम. नायर, सायन या शहर भागातील रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. विस्तारात एकूण २ हजार ३७ बेड उपलब्ध होतील. त्यापैकी ३३१ बेड अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येतील. आवश्यकता भासल्यास या विभागातील बेड वाढविण्याचा निर्णय भविष्यात घेतला जाईल, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

महानगरपालिकेची एकूण १६ रुग्णालये असून या रुग्णालयांचा विस्तार केला  जात आहे, तर काही रुग्णालये नव्याने बांधली जाणार आहेत.

वांद्रे भाभा :

रुग्णालयांच्या विस्तारात वांद्रे भाभा रुग्णालयातील बेडची संख्या ५१ ने वाढणार असल्याने एकूण बेडची संख्या ४९७ होईल.  त्यात ३९० बेड  सर्वसाधारण वॉर्डात आणि ६१ बेड अतिदक्षता  विभागात असतील. सुपरस्पेशालिटी विभागाच्या सर्वसाधारण वॉर्डात ३५ बेड आणि अतिदक्षता विभागात १४ बेड असतील. शिवाय  कॅथलॅब, कार्डियाक सुविधा दिल्या जातील.

बोरीवली भगवती :

या रुग्णालयात बेडची संख्या ३७६ वरून ४९० होईल.  यात सर्वसाधारण वॉर्डात ३७८  आणि सर्वसामान्य अतिदक्षता विभागात ७० बेड असतील, तर ११२ बेड सुपरस्पेशालिटी आणि अतिदक्षता विभागात २० बेड होतील. उर्वरित बेड अन्य विभागासाठी असतील.

मुलुंड अगरवाल रुग्णालय:

या ठिकाणी बेडची संख्या २२५ वरून ४७० होईल. त्यात  ३१० बेड जनरल स्पेशालिटीत असतील, तर ६५ बेड अतिदक्षता विभागातील असतील. सुपरस्पेशालिटी  विभागात ३५ बेड अतिदक्षता विभागासाठी असतील.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाहॉस्पिटल