Join us

गणेशोत्सवात वीजपुरवठ्यासाठी सुविधा कक्ष; अर्ज नोंदविण्याचे बेस्ट प्रशासनाकडून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:16 AM

गणेशोत्सव दीड महिन्यांवर आला असून या सणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज केले जातात.

मुंबई : गणेशोत्सव दीड महिन्यांवर आला असून या सणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज केले जातात. या पार्श्वभूमीवर अटी व नियमांच्या पूर्ततेसह अर्ज स्वीकारण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून सुविधा कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपले अर्ज या सुविधा कक्षावर जमा करण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे. अर्जासोबत नियम व अटीबाबतही बेस्टने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. अर्ज ऑनलाइन नोंद करायचे असल्यास मंडळांनी बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधी एक दीड महिना मंडळांकडून तयारी सुरू केली जाते. उत्सवासाठी लागणाऱ्या परवानग्यांची पूर्तता वेळेत करणे आवश्यक असते. गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवादरम्यान तात्पुरती वीज जोडणी करण्यात येते. ग्राहक सेवा विभागात गणेशोत्सवासाठी तात्पुरता वीजपुरवठ्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुविधा कक्षात गणेशोत्सव मंडळाने आपला मागणी अर्ज लवकरात लवकर नोंदविणे आवश्यक आहे.

अर्जासोबत काय आवश्यक ?

१)  अनामत रकमेचा परतावा एन.ई.एफ.टी.द्वारे मंडळाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रपत्र भरावे. अर्जावर मंडळाचा रबरी शिक्का असावा. मंडपाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारून हमीपत्र सादर करावे. ज्या ठिकाणी गणेशोत्सव मंडपाची व्यवस्था आहे त्या जागेच्या मालकाची परवानगी आवश्यक आहे. 

२) गणेशोत्सव मंडळांनी गणेश उत्सवाच्या मंडपात योग्य क्षमतेचे वायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदारांकडून भारतीय विद्युत नियमांनुसार करून घ्यावे, पालिकेकडून मंडप उभारणीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. मंडळाने मागील वर्षाची विद्युत बिलाची थकबाकी असल्यास भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सववीज