मुंबई : यंदाच्या आषाढी एकादशीत फळं आणि काही उपवासाच्या पदार्थांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. ‘एकादशी दुप्पट खाशी’ असे म्हणतात. पण, या महागाईमुळे भाविकांच्या खिशाला कात्री लागली आहे. आषाढी एकादशीपासून सण आणि उपवासाची सुरुवात होत असते. यानंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात तर जवळजवळ १५ दिवस उपवासाचेच असतात. त्यामुळे आषाढीपासून पुढील काळात उपवासाच्या पदार्थांची तसेच फळांची मागणी वाढत जाते. मात्र, एकादशी समोर ठेवूनच ही कृत्रिम वाढ केल्याची तक्रार ग्राहकांमधून केली जात आहे.
तयार पदार्थही महाग-
हॉटेलमधील तयार पदार्थांचे दरही वाढले आहेत. साबुदाणा वडा, खिचडी ५० रुपये, ६० रुपये प्लेट आहे. थालीपीठ, बटाटे वेफर्स, बटाटा चिवडा, साबुदाणा चिवडा, रसमलाई, मँगो बर्फी, कलाकंद आदी पदार्थही महागले आहेत.
वर्षभरामध्ये काही टप्प्यांमध्ये पदार्थांची भाववाढ होणे सामान्य आहे. यंदा साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या भावात काहीच वाढ झाली नाही. पण, फळे आणि रताळे यांच्या दरात हवामान आणि पुरवठा यांच्या परिणामांमुळे दरवाढ झाल्याचे दिसत आहे.- प्रशांत पवार, व्यापारी.
नेहमी सणांचे दिवस सुरू झाले की, खाद्यपदार्थांचे भाव वाढलेले दिसतात. फळे, सुकामेवा अशा पदार्थांचा वापर उपवासासाठी केला जातोच. सणा-सुदीच्या दिवशी कृत्रिम दरवाढ करून पुरेपूर फायदा घेण्याचा व्यापारी आणि दुकानदारांचा डावच असतो की काय, असे आता वाटू लागले आहे.- रामदास गायकवाड, ग्राहक
असे आहेत किलोचे दर (रुपयांत)-
१) साबुदाणा- ७० ते ८०
२) शेंगदाणे- ९० ते १००
३) भगर- ८० ते ९०
४) बटाटा- ३५ ते ४०
५) रताळे- ९० ते १००
६) केळी- ६५ ते ७० रुपये डझन