मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याच्या नावाखाली बाप-लेकाने धनसंपती इंटरप्रायजेस आणि धनयश इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या माध्यमातून ३० गुंतवणूकदारांची २ कोटी ७० लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार भांडुपमध्ये समोर आला आहे. भांडुप पोलिसांनी धनसंपती इंटरप्रायजेस कंपनीचे संचालक सूर्यकांत मोहिरे आणि धनयश इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक सिध्देश मोहिरे यांच्या विरोधात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
प्रकाश कामथे (३३, रा. घाटकोपर) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तो एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहेत. तक्रारीनुसार, त्याच्या व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या सिध्देशने त्याच्या धनयश इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देत असल्याचे सांगितले. प्रकाश नोव्हेंबर २०२२ मध्ये सिद्धेशच्या कार्यालयात गेला. तेथे प्रकाश आणि त्याचे वडील सूर्यकांत मोहिरे भेटले. प्रकाशने त्याचे वडील सूर्यकांत हे धनसंपत्ती इंटरप्रायजेस या कंपनीचे संचालक असून दोन्ही कंपन्यांमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ग्राहकांना चांगला मोबदला देत असल्याचे सांगितले.
एक कोटी १३ लाख केले परत-
१) प्रकाशला जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रकाशने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. प्रकाशने १५ लाख ७६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकीच्या रकमेवर डिसेंबर २०२३ पर्यंत मोबदला मिळत होता. मात्र, त्यानंतर मोबदला मिळणे बंद झाल्याने त्याला संशय आला.
२) त्याने चौकशी करताच या बाप-लेकाने गुंतवणूकीच्या नावाखाली अनेकांना गंडविल्याचे समोर आले. प्रकाशसह ३० जणांनी ३ कोटी ८३ लाख ९१ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. अखेर, बाप-लेकाला पोलिसांत जाणार असल्याचे सांगताच त्याने गुंतवणूकदारांना एकूण एक कोटी १३ लाख ३१ हजार ७५७ रुपये परत केले.
३) मात्र, उर्वरित पावणे तीन कोटी परत न केल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.