Join us

महिला पोलिसाला मैत्रिणीनेच घातला गंडा; विविध कारणांनी उकळले अडीच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:19 AM

याप्रकरणी संबंधित महिला पोलिसाने भोईवाडा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : आईच्या आजारपणासह आर्थिक अडचणीत केलेली मदत परत मागितल्यानंतर ती देण्यास टाळाटाळ करत एका महिला पोलिसाच्या मैत्रिणीने तिला दोन लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला आहे. 

याप्रकरणी संबंधित महिला पोलिसाने भोईवाडा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली येथील रहिवासी असलेली ३७ वर्षीय तक्रारदार महिला मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. २०२१ मध्ये एका ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी तक्रारदाराशी ओळख झाली. पुढे  त्यांच्यात कौटुंबिक मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. 

दरम्यान, कोरोना काळात त्या मैत्रिणीने घरोघरी जाऊन सुविधा पुरविणे, ऑनलाइन ऑर्डर मिळवून ब्युटीपार्लरचा व्यवसाय सुरू ठेवला होता; मात्र नंतर ऑर्डर मिळविणे आणि सेवा पुरविणे कठीण असल्याने तिची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आई एका दुर्धर आजाराने ग्रासली आहे, असे सांगत तिने महिला पोलिसाकडे आर्थिक मदतीची विनंती केली.

क्रेडिट कार्डवरून खरेदी-

१) ब्युटीपार्लरचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी तिने महिला पोलिसाकडून पैसे घेतले. महिला पोलिसाने तिचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आठ दिवसांच्या मुदतीत परत करण्याच्या बोलीवर दिले होते. 

२) हे मंगळसूत्र तिने वडाळा येथील एका सराफाकडे तारण ठेवत त्यावर दीड लाख रुपये घेतले. तसेच महिला पोलिसाच्या क्रेडिट  कार्डवरून तिने ९० हजारांची खरेदी केली. ही सर्व रक्कम एकूण २ लाख ४० हजार रुपयांच्या घरात गेली.  

३) मैत्रिणीचे सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर महिला पोलिसाने तिच्याकडे दिलेली रक्कम परत मागितली; मात्र ती वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करू लागली. फोन घेणेही बंद केल्याने महिला पोलिसाने तक्रार दिली

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस