Join us

पालिका रुग्णालयांमध्ये फिव्हर ओपीडी सुरू; तत्काळ उपचारास प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 10:49 AM

पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्यासह डेंग्यू, मलेरिया, आदी साथीचे आजार वाढतात.

मुंबई : पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्यासह डेंग्यू, मलेरिया, आदी साथीचे आजार वाढतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये तापसदृश आजारांच्या उपचारांसाठी २४ तास बाह्य रुग्णसेवा आणि ‘फिव्हर ओपीडी’ सुरू केली आहे.

तत्काळ उपचारास प्राधान्य-

पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने पालिकेच्या विविध यंत्रणांच्या सक्रिय सहभागाने उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळी आजारांच्या वेळीच प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा त्वरित शोध घेऊन  तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यंदा संपूर्ण मुंबई महानगरात पावसाळी आजारांसाठी तीन हजार बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच तापसदृश आजारांसाठी ‘फिव्हर ओपीडी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. 

राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात दुपारी ४ ते रात्री १०, डॉ. रू. न. कूपर दुपारी २ ते रात्री ८, लोकमान्य टिळक सर्वसाधारण (शीव) रुग्णालयात २४ तास, बा. य. ल. नायर रुग्णालयात दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत, तर उपनगरी रुग्णालयात सायंकाळच्या वेळेत बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध आहे.

फोकाय पद्धतीची अंमलबजावणी-

१) जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली) व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेत मलेरिया, डेंग्यू आणि जलजन्य आजार यांचे प्रतिबंधक नियंत्रण व उपाययोजना याबाबत विशेष लक्ष केंद्रित अर्थात ‘फोकाय’ आधारित उपचार  आणि सूक्ष्म आराखडा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. 

२) जेथे एखाद्या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत, अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करतानाच अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या विशिष्ट विभागात राबविण्याचे उद्दिष्ट या पद्धतीनुसार ठेवण्यात येते.

३) डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे,  तसेच ती स्थाने नष्ट करणे, अशा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. डेंग्यू आणि मलेरियाची रुग्णांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. 

आराखड्याची अंमलबजावणी करणार-

यंदाच्या पावसाळ्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करतानाच आक्रमकपणे हा आराखडा राबवण्यात येणार आहे. एखाद्या भागात सर्वेक्षण करताना डासांच्या उत्पत्तीचा उगम शोधणे, सर्वेक्षण करणे, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण शोधणे आणि रुग्णांवर उपचार करणे यासारख्या उपाययोजना यामध्ये केल्या जातील, जेणेकरून या आजारांवर पूर्णतः नियंत्रण ठेवता येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल