लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणपतीच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवात नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर व विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या १० दिवसांत युद्ध पातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची डागडुजी करावी, असे स्पष्ट निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
मुंबईतील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यावर भर द्या. ‘मास्टिक’ पद्धतीने रस्त्यांची डागडुजी करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे या पद्धतीनेच रस्त्यांची कामे करावीत, असेही बांगर यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता दुय्यम अभियंते, साहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंता हेही कार्यस्थळावर उपस्थित राहून रस्त्यांची पाहणी करणार आहेत.गणेशाचे आगमन आणि विसर्जन सोहळ्यापूर्वी रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते युद्धपातळीवर बुजवावेत, आवश्यक त्या रस्त्यांची डागडुजी करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करावी, यासाठी बांगर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिका मुख्यालयात रस्ते विभागातील अभियंत्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रमुख अभियंता गिरीश निकम आदी उपस्थित होते.
७ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सव मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान मुंबईकरांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एकूण २२७ नागरी संस्था प्रभागांसाठी (बिट) प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. दुय्यम अभियंता विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने बुजवत आहेत.
‘कंत्राटदारांना सूचना द्या’-
१) यंदा खड्डे दुरुस्तीसाठी मास्टिक पद्धतीचा अवलंब केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. त्यामुळे मास्टिक पद्धतीनेच रस्त्यांची डागडुजी करा.
२) सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष द्यावे. जर कमी कालावधीत अधिकचा पुरवठा आवश्यक असेल तर तो उपलब्ध होईल, अशा पद्धतीने यंत्रणा सक्षम करावी. खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी समन्वय ठेवावा, असे बांगर यांनी स्पष्ट केले.