खड्डे बुजवा, अन्यथा खैर नाही; मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:57 AM2024-07-20T11:57:25+5:302024-07-20T12:00:25+5:30
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे.
मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे. त्यानुसार रस्त्यांची पाहणी करून खड्डे शोधा आणि तत्काळ बुजवा, असे निर्देश पालिकेने संबंधित दुय्यम अभियंत्यांना दिले आहेत. मात्र, खड्डे वेळेत बुजवले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खड्डे वेळेत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
रस्त्यांविषयी येथे करा तक्रार -
खड्डेविषयक किंवा दुरुस्तीयोग्य रस्त्यांविषयी तक्रार करायची असल्यास ती ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल. पालिकेच्या @mybmc या ‘एक्स’ अकाऊंटला टॅग करूनही नागरिकांना खड्डेविषयक तक्रार नोंदविता येणार आहे.
दुय्यम अभियंत्यांना दिल्या होत्या नोटिसा -
जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोड आणि नाहूर येथे मोठे खड्डे आढळल्याने येतील दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे कळते. २२७ प्रभागांतील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. खड्डा आढळल्यास अथवा निदर्शनास आणून दिल्यानंतर २४ तासांत तो भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खड्ड्यांकडे कानाडोळा केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यात खड्डे दिसल्यास ते त्वरित बुजवावेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडू नयेत, अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिल्याचे कळते.
कोट्यवधींचा खर्च -
१) मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पहिल्या पावसातच खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. गेल्या काही दिवसांत जोरदार पडलेल्या पावसामुळे खड्डे पडले असून, पालिकेकडे वॉर्डस्तरावर खड्ड्यांविषयी तक्रारी आल्या आहेत.
२) १ जून ते १६ जुलैपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले, तरी ते वेळेत बुजवले जात नसल्याचे समोर आले आहे.