मुंबई : मेट्रो ९ मार्गिकेच्या उत्तनजवळील डोंगरी येथे कारशेड उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागितलेल्या निविदांमध्ये दोन कंत्राटदार तांत्रिक निविदेत पात्र ठरले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून आता या निविदांची छाननी सुरू करण्यात आली आहे.
एमएमआरडीएकडूनमेट्रो ९ मार्गिकेचे कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये उभारले जाणार आहे. या ठिकाणी ४० हेक्टर जागेवर कारशेडची उभारणी केली जाणार आहे. कारशेड उभारणीसाठी तब्बल ६२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी तीन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामध्ये ऋत्विक प्रोजेक्ट, केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड आणि एनसीसी लिमिटेड यांचा समावेश होता.
मेट्रो ९ मार्गिका-
१) लांबी १३.६ किमी
२) स्थानके १०
३) कारशेड उभारणीसाठी अपेक्षित खर्च - ६२६ कोटी रुपये
तांत्रिक निविदांची तपासणी केली असता ऋत्विक प्रोजेक्ट आणि एनसीसी लिमिटेड यांनी दाखल केलेल्या निविदा पात्र ठरल्या आहेत. लवकरच या कंपन्यांच्या आर्थिक निविदांची छाननी पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, उत्तन येथील कारशेडची जागा पूर्वीच्या प्रस्तावित कारशेडपासून तब्बल अडीच किलोमीटर दूर आहे. त्यामुळे राई-मुर्धे ते उत्तन दरम्यान नव्याने मेट्रो मार्गिकेची उभारणी करावी लागणार असून त्यासाठी तब्बल १७१७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या कारशेडच्या उभारणीसाठी तब्बल चार वर्ष चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.
या भागात खडक फोडून कारशेड उभारावे लागेल. त्यातून त्याला थोडा अधिक काळ लागणार आहे. त्यातून या मेट्रो मार्गिकेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.