Join us  

आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:51 AM

मुंबई शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांतील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांतील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. तसेच सिग्नल यंत्रणा, ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीची कामे शुक्रवारी सुरू होती. दरम्यान, दिवसभरात मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या १० ते १२ लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच रात्रीच्या काही मेल एक्स्प्रेस रीशेड्युल करण्यात आल्या होत्या.

सर्व लोकल गाड्या शुक्रवारी  १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी भायखळा स्थानकात ठाणे लोकल रद्द करण्यात केल्याची घोषणा करण्यात येत होती. लोकलसोबत याचा परिणाम मेल एक्स्प्रेसवरही झाला. सीएसएमटीवरून सकाळी सुटणारी कोयना एक्स्प्रेस रिशेड्युल केली. ती दुपारी अडीच वाजता सुटली. त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. 

दरम्यान, बुधवारच्या पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग स्थानकांत पाणी साचले होते. साधारणत: पावसात मस्जिद, कुर्ला, सायन, गोवंडी, चुनाभट्टी या स्थानकांत पाणी साचते; परंतु  यंदा भांडुप स्थानकात पहिल्यांदाच पाणी साचल्याने त्याचे कारण रेल्वे, पालिका प्रशासन शोधत आहे. 

मध्य रेल्वेवर फक्त मुसळधार पावसामुळेच नाही तर इतर दिवशीही लेटमार्कच असतो. त्याचा प्रवाशांना त्रास होतो. मुंबईची रेल्वे यंत्रणा ही १५० वर्षे जुनी असून ती त्याकाळानुसार पुढील १०० वर्षे लक्षात घेऊन उभारण्यात आली होती. यामध्ये आता सुधारणा करून ती आतापासून पुढील १०० वर्षे चालविण्याच्या दृष्टीने अद्ययावत करण्याची गरज आहे. - मधू कोटियान, अध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपाऊस