मेट्रो मार्गिकेवरील पहिला डबलडेकर पूल सेवेत; मीरा-भाईंदरमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:15 AM2024-08-29T10:15:15+5:302024-08-29T10:20:06+5:30

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेवर उभारण्यात आलेल्या मुंबई महानगरातील पहिल्या डबलडेकर उड्डाणपुलाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले.

in mumbai first double decker bridge on metro line commissioned the journey of the citizens of mira bhayandar will be pleasant  | मेट्रो मार्गिकेवरील पहिला डबलडेकर पूल सेवेत; मीरा-भाईंदरमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार

मेट्रो मार्गिकेवरील पहिला डबलडेकर पूल सेवेत; मीरा-भाईंदरमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदरमेट्रो ९ मार्गिकेवर उभारण्यात आलेल्या मुंबई महानगरातील पहिल्या डबलडेकर उड्डाणपुलाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे मीरा-भाईंदर येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. दरम्यान, या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, एमएमआरडीएचे सहमहानगर आयुक्त राधाबिनोद शर्मा उपस्थित होते.

सध्या दहिसर ते मीरा-भाईंदरदरम्यान मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत आहे, तसेच ही मेट्रो मार्गिका मीरा-भाईंदर रस्त्यावरूनच जात असल्याने या भागात विविध जंक्शनच्या ठिकाणी कोंडीत आणखी भर पडते. मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर मेट्रोतून उतरून प्रवासी या जंक्शनवर दाखल होणार असल्याने कोंडीची शक्यता होती.

तीन जंक्शनवरील कोंडी फुटणार-

उड्डाणपुलावर मेट्रोच्या मार्गाचीही उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी सध्याचा अस्तित्वातील रस्ता असेल. त्यावर ५.५ मीटर उंचीवर नव्याने उभारण्यात आलेला डबलडेकर उड्डाणपूल असेल, तर या पुलावर मेट्रोचा मार्ग उभारण्यात आला आहे. या पुलामुळे प्रवाशांच्या वेळेत ८ ते १० मिनिटांची बचत होईल, तर इंधनाचीही बचत होणार आहे.

७५ मीटर उंचीवर विद्युत वाहिनी-

उड्डाणपुलाच्या कामासाठी एमएमआरडीएने सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या मुख्य डबल-सर्किट डहाणू-वर्सोवा विद्युत वाहिनीचे स्थलांतर केले, तसेच मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरू नये यासाठी ही विद्युत वाहिनी तब्बल ७५ मीटर उंचीवर उभारण्यात आली. त्यातून आता ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंचीवर असलेली वाहिनी झाली आहे.

वाहतूक कोंडी कमी होणार-

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, ‘मुंबई आणि उपनगरातील जागेची कमतरता पाहता मेट्रोच्या खांबांवर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. 

तंत्रज्ञानाचा वापर-

उड्डाणपूल मल्टी एक्सेल वाहने आणि सततची वाहतूक विचारात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामात आय-गर्डर प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुलाच्या उभारणीत वेळेची बचत झाली आहे. 

या उड्डाणपुलाची उभारणी करताना ‘टायर स्ट्रॅडल कॅरियर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यातून दिवसा वाहतूक सुरू असताना या पुलावर यू-गर्डर उभारता आले. या रस्त्यावर दर तासाला सुमारे ८०० वाहने प्रवास करतात. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा झाला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: in mumbai first double decker bridge on metro line commissioned the journey of the citizens of mira bhayandar will be pleasant 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.