Join us

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी होणार, 'MSRDC' कडून तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:59 AM

वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारी सुरू केली असून, आता पावसाळा संपल्यानंतर या प्रकल्पाच्या कामांना गती दिली जाणार आहे. 

एमएसआरडीसीकडून १७.७ किलोमीटर लांबीच्या सी लिंकची उभारणी केली जात आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळा संपत आल्याने समुद्रातील कामांनाही गती दिली जाणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने नियोजन केले असून, पुढील दोन आठवड्यात समुद्रात पहिला स्पॅन उभारणीच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे.  कार्टर रोड ते वांद्रेदरम्यानच्या मार्गावर हा पहिला स्पॅन उभारला जाणार आहे. सद्य:स्थितीत या स्पॅनच्या उभारणीची पूर्वतयारी सुरू असून, समुद्रातील कामाला परवानगी मिळताच पुढील दोन आठवड्यानंतर त्याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मे २०२८ उजाडणार-

या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्या वेळी ऑगस्ट २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता सर्व अडथळे दूर झाले असून, कामांनी गती पकडली आहे. मात्र, या प्रकल्पाला विलंब झाल्याने आता कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्णत्वास आता मे २०२८ उजाडणार आहे.

१) सी लिंकच्या मुख्य सेतूची लांबी - ९.६० किमी

२) प्रकल्पाची एकूण लांबी - १७.७ किमी

३) प्रकल्पाचा खर्च -  १८,१२० कोटी रु. 

४) प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी - मे २०२८

टॅग्स :मुंबईराज्य सरकाररस्ते वाहतूक