जयंत होवाळ, मुंबई : डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप येईल, असे दिसत आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल कंपनीने स्वारस्य दाखवले असून त्यांनी जागेची मागणी केली आहे. नेमक्या कोणत्या डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यात येईल, याची पालिकेच्या स्तरावर चाचपणी केली जात आहे. देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
देवनार येथे कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प २०१६ मध्ये आकारास आला; परंतु विविध कारणांनी त्यास विलंब झाला. या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून ६०० मेट्रिक टन कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी २०२२ मध्ये चेन्नई एम.एस.डब्ल्यू. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. या प्रकल्पांसाठी ६४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. पुढील १५ वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे ४०० कोटी याप्रमाणे एकूण १,०५६ कोटी रुपयांचे कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात येणार होते. प्रत्यक्षात कोणतीही कामे न झाल्यामुळे कंत्राट रद्द करण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ३ हजारांऐवजी प्रत्येकी ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्याची सूचना केली होती.
मागील वर्षी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी मुंबई भेटीवर आले होते. तेव्हा डम्पिंग ग्राउंडवर वीजनिर्मिती आणि काही डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यावर चर्चा झाली होती. या बैठकीत वीजनिर्मितीवर भर देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची सूचना केली होती. मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रोज बाराशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया -
१) वीजनिर्मितीसाठी बीपीसीएल कंपनीने निविदा भरली आहे.
२) या निविदेची छाननी सुरू आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
३) संबंधित कंपनीने रोज बाराशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे.
दररोज साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा-
मुंबईत दरदिवशी सुमारे साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील ३ हजार ते ३,५०० मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्याचे काम कमी झाले असून हे डम्पिंग ग्राउंड बंद होण्याच्या मार्गावर आहे. आता पुन्हा वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू झाली आहे.