मुंबई: पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पालिकेकडून सुरू आहेत. १५ मेनंतर या कामाला आणखी गती मिळणार असून पूरप्रवण क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरातील नालेसफाईला प्राधान्य दिले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या मुखाशी असलेला गाळ काढण्यावर विशेष भर दिला जाईल, जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास कोणाताही अडथळा येणार नाही, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या ठिकाणी विशेष लक्ष-
मुंबईत तब्बल ३८६ फ्लडिंग पॉइंट आढळले असून तेथे उपाययोजना केल्या आहेत. नाल्यांमध्ये कचरा अडकणार नाही, ही पूर प्रवण क्षेत्रे पावसाळ्यात तुंबणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
१) यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत ७ लाख ४३ हजार २०७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ७२.७३ टक्के गाळ काढण्यात आला.
२) नालेसफाई उशिरा सुरू केल्यामुळे नालेसफाईची कामे यंदा रात्रंदिवस केली जाणार आहेत. महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान-मोठे नाले, हायवेलगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांवर सोपविले आहे.