लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अवघ्या ५० रुपयांच्या सुट्या पैशांवरून प्रवाशाचा कंडक्टरसोबत वाद झाला, त्यातून वातानुकूलित बसच्या काचा फोडण्यात आल्याने बेस्टला २० हजारांचा फटका बसला आहे. हा प्रकार सांताक्रुझ पूर्व परिसरात मंगळवारी घडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन प्रवाशांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार किरण देसाई हे बस कंडक्टर असून, मंगळवारी सकाळी १० वाजता कुर्ला स्टेशन येथून सांताक्रुझ डेपो या मार्गावर निघाले होते. देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आझादनगर बस स्टॉपला आरोपी आणि इतर प्रवासी गाडी चढले. त्यापैकी एकाने ५० रुपयांची नोट देऊन सांताक्रुझ डेपोचे दोन तिकीट मागितले. त्यावर देसाई यांनी त्याला सुटे पैसे दे, असे सांगितले. त्यावर त्याने माझ्याकडे सुटे पैसे नाहीत, असे म्हणत आम्ही कलिना बस स्टॉपला उतरतो, असे म्हणाला. जवळपास १०:३० च्या सुमारास बस कलिना बस स्टॉपला आल्यावर ती दोन्ही मुले बसच्या खाली उतरली आणि तिकिटासाठी पैसे देणाऱ्या मुलाने देसाई यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
आरोपींना बजावली नोटीस-
१) त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने खाली पडलेला फरशीचा मोठा तुकडा घेऊन बसच्या बाजूच्या काचेवर मारला.
२) त्यामध्ये काच फुटून बसचे तब्बल २० हजारांचे नुकसान झाले. या घटनेनंतर देसाई गाडीतून खाली उतरल्याने दगड मारणारा मुलगा पळून गेला.
३) याप्रकरणी देसाई यांनी वाकोला पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा वाद अवघ्या ५० रुपयांच्या सुट्या पैशांवरून झाल्याने याबाबत बेस्ट प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.
४) याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना नोटीस दिल्याचे वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले.